‘कोरोना’च्या ‘गाइडलाइन’कडे आहे का कुणाचं लक्ष?

0
Rate Card
कोरोना महामारीने आपले रौद्ररूप कमी केल्याने लोक कोरोनाच्या बाबतीत बेफिकीर झाले आहेत.  आता जनतेला कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडू लागला आहे.  ‘दो गज की दुरी’ असे कधी नव्हतेच अशा प्रकारे लोक वागू लागले आहेत. लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, लोक सोशल डिस्टन्सिंग विसरले आहेत.
मास्क घालणे तर आता त्यांना एक ओझे वाटू लागले आहे. वास्तविक कोरोना व्हायरस अजून हद्दपार झालेला नाही.  असे असूनही, जनतेसह प्रशासन आणि सरकार देखील कोरोनाबाबत जागरूक राहताना दिसत नाही.

 

केंद्र सरकारनेही कोरोनाच्या धोक्यांकडे डोळेझाक केल्यामुळे लोक कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाकडे लक्ष देत नाहीत.  प्रशासन सुद्धा फक्त सूचना देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहे.  देशात कुठेही कोरोनाशी संबंधित कोणतीही भयानक बातमी नाही.

 

 

त्यामुळे कोरोनाची भीती उरलेली नाही.कोरोनाची प्रकरणे कमी होण्याबरोबरचच सामान्य जनता, सरकार, प्रशासन आणि पोलीस या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपाबद्दल चिंतित आहेत, परंतु त्यांच्यातही गंभीर मतभेद आहेत. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोरोना अजुन गेला नाही.

 

 

याशिवाय करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेचा विचार केला पाहिजे. सध्या रशिया आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेतला पाहिजे. आपण दुसऱ्या लाटेबाबत बेफिकीर राहिल्याने ही लाट रौद्ररूप धारण करू शकली. पुन्हा तसे होऊ नये यासाठी,दुसऱ्या लाटेचे परिणाम लक्षात घेतले पाहिजेत.

 

 

वातावरणातील सततच्या बदलामुळे हंगामी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.  आगामी सण आणि विवाहसोहळे पाहता बाजारपेठेतही गर्दी वाढलेली दिसत आहे.अशा परिस्थितीत, कोरोना मार्गदर्शक तत्त्वाचा विसर पडणे घातक ठरू शकते.  कोरोनाचा धोका थोडा कमी झाला आहे, हे जरी खरे असले तरी पूर्णपणे तो टळलेला नाही.  त्यामुळे आताही आपण पूर्वीप्रमाणेच सावधगिरी बाळगली पाहिजे.

 

 

लसीकरणामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेला आहे. पण तरीही देशात रोज साधारणपणे 15 ते 20 हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहेत. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली येथे आढळलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत.  रुग्णही बरे झाल्यानंतर घरी पोहोचत आहेत. बाजारपेठ,विवाह सोहळे आणि अन्य कार्यक्रम आयोजित होत असल्याने आणि अशा ठिकाणी पूर्ण क्षमतेने लोक गर्दी करत असल्याने कोरोना कधीही तीव्र स्वरूप धारण करू शकतो.

 

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते अलीकडच्या काही दिवसांत मुंबई, पुणे आणि नाशिक शहरांच्या दौऱ्यावर गेले होते. याचा अर्थ या शहरांमध्ये छुप्या रीतीने कोरोना व्हायरस  अस्तित्वात आहे. त्यामुळे दक्षता आवश्यक आहे.

 

कोरोनाची दुसरी लाट संपताच जनतेतच नव्हे तर सरकारी पातळीवरही हलगर्जीपणा दिसून आला. देशाने कोरोनाचे तांडव पाहिले आहे.  असे असतानाही याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे.

 

 

ही प्रवृत्ती तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकासाठी घातक ठरू शकते. हात धुणे, अंतर ठेवणे आणि मास्क लावणे यासारख्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना विसरून चालणार नाही. प्रशासनानेही मोकळीक देताना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याविषयी कडक धोरण अवलंबले पाहिजे.

 

 

सरकार आणि उच्च पदावरील लोक स्वतःच कोरोना मार्गर्शक तत्त्वे पायदळी तुडवत आहेत.  चौकाचौकात पोलीस मास्कशिवाय उभे असलेले दिसत आहेत.सर्व काही देवाच्या भरवशावर चालले आहे.सणानिमित्त बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, बस इत्यादींची गर्दी होत आहे, परंतु कोरोना संसर्गाची मार्गदर्शक तत्वे विसरली गेली आहेत. याला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतर लोकांनी स्वतःला अमर समजण्यास सुरुवात केली आहे.  जणू त्यांना पुन्हा कधीच कोरोना होणार नाही.

 

 

 

यामुळे लोक खुलेआम कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहेत.  हे दुर्लक्ष येत्या काळात जड जाणार आहे.  पुढचा भयानक धोका ओळखून लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

 

-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.