आली दिवाळी ; गर्दी उदंड, यंत्रणा थंड…जत,प्रतिनिधी : दिवाळीच्या खरेदीसाठी जत शहरातील विविध मार्गावरील बाजारपेठांत उदंड गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत असून, वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. मात्र,अद्यापही करोनाची भिती कायम असल्याने पुरेशी दक्षता घेणे गरजेचे असतानाही पोलिसांसह अन्य यंत्रणा याबाबत पुरेशा गंभीर नसल्याचे दिसते.ही बेफिकिरी करोनास आमंत्रण देणारी ठरण्याची भीती निर्माण झाली असून, वेळीच उपाययोजनांची अपेक्षा सजग नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक आपली वाहनेही बाजारपेठांतील रस्त्यांवर उतरवीत असल्याने बाजारपेठांत वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी ठरू लागली आहे. मेनरोडसारख्या वर्दळीच्या परिसरात मंगळवारी दुपारी तब्बल तासतासभर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरसावलेल्या पोलिसाकडून मेनरोड परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने वाहतुकीस कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त नागरिकांचे फावते आहे.त्यामुळे पोलीसांनी मुख्य बाजार पेठेत कारवाईचा बगडा उगारावा,अशी मागणी होत आहे.