सांगली : अन्न व औषध प्रशासनातर्फे परराज्यातून खवा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणी मोहिमेंतर्गत मिरज येथे दोन वाहनांवर छापा टाकून 2 लाख 70 हजार 148 रूपये किंमतीचा 1 हजार 78 कि.ग्रॅ. खवा विनापरवाना, विनालेबल, अस्वच्छ वाहनामधून वाहतूक करत असल्याचे आढळल्याने व भेसळीच्या संशयावरून जप्त केला.
याप्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी सांगितले.
मिरज येथे दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी कर्नाटक राज्यातून येणारे बस क्र. केए 29 एफ-1523, मालक हाजीलाल हाजी अन्वरसाब पैलवान, मे.एच.एच. पैलवान, भरपेट गल्ली, जमखंडी, जि. बेळगाव, एम एच 09-एफ एल 5297 या वाहनाचे मालक रविंद्र बंडू माळी, मे श्रीशिवशक्ती मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्टस, इंगळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव व मे. श्रीकृष्ण दुग्धालय, नरसोबाचीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांच्यावर छापा टाकून खवा जप्त करण्यात आला.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्यासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. महाजन, श्री. स्वामी व नमुना सहायक तानाजी कवळे यांनी केली.