शहरातील संकुलांची पार्किंग झाली ‘मिस्टर इंडिया’, वाहने पार्क करायची कुठे?
जत : पार्किंगच्या नावाखाली शहरातील काही संकुलांनी सार्वजनिक रस्ताच गिळंकृत केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एका ठिकाणचे पार्किंग स्थळ तळघरात असून, ते अद्याप सुरू करण्यात न आल्याने संकुलासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी, वाहनांच्या रांगा लागत आहे.काही बोटावर मोजण्याइतपत व्यावसायिक संकुले सोडली, तर बहुतांश व्यावसायिक संकुलधारकांनी पार्किंगची जागा गिळंकृत केली आहे, तर अनेक ठिकाणी संकुलधारकांकडून सार्वजनिक जागेचा वापर हक्काचे, आमचेच पार्किंग म्हणून केली जात आहे.
पालिका वा अन्य शासकीय यंत्रणाच्या मालकीचे मोकळे भूखंड पार्किंगच्या नावाखाली घशात घालण्याचे उद्योग तर सुरू नाही ना, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने ‘नो पार्किंग’मधील ती वाहने उचलून दंड वसूल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक देखील अधिकृत पार्किंगस्थळीच आपली वाहने लावतील. दरम्यान, शहरातील अनेक संकुलाची पार्किंग ‘मिस्टर इंडिया’ झाल्याचे वास्तव आहे.
पालिकेकडून अशा इमारतींना, संकुलांना ‘बीसीसी व ओसी’ देताना त्यातील प्रतिष्ठानने परवानगीआधीच सुरू तर करण्यात आली नाही ना, याची खातरजमा करण्याची देखील गरज आहे. परवानगी देताना त्या व्यापारी प्रतिष्ठानाच्या पार्किंगची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील बाजार परवाना विभागावर येऊन ठेपली आहे.
