बेधडक वृक्षांची कत्तल | जत तालुक्यातील चित्र : वन विभाग अडकला हप्तेबाजीत : दररोज 10 ते 12 ट्रक लाकूड तालुक्याबाहेर

0
Rate Card

जत : वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी हप्तेखोरीला सोकावल्याने जत तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठीची शासनाची ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही योजना हवेतच विरली आहे.बेसुमार फळाच्या वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल केली जात आहे. त्यामुळे जत तालुक्यातील वन विभागाचे चालले आहे तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.


तालुक्यातील पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. दररोज 10 ते 12 ट्रक लाकूड भरून जात आहे. लाकूड वखारीचा धंदाही तेजीत सुरू आहे. अवाजवी वृक्षतोड होऊ लागल्याने हा भाग भकास बनला आहे. सांगली जिल्ह्यात विस्ताराने जत तालुका मोठा आहे. एकूण तालुक्याचे क्षेत्रफळ 2 लाख 25 हजार 828 हेक्टर आहे. लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 35 हजार 189 हेक्टर आहे. बागायत, क्षारपड, डोंगराळ क्षेत्र 11305 हेक्टर, तर वनक्षेत्र 11305 हेक्टर आहे. 


जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी बांधावरील, माळरानावरील झाडांची विक्री करण्याचा सपाटा मोठय़ा प्रमाणात लावला आहे. बाभूळ, चिंच, लिंब, आंबा, निलगिरी, करंजी, डोंगरी झाडांची तोड सुरू आहे. रोज दहा ट्रक लाकूड या भागातून इचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर भागात जाते. लाकूड भरून त्यावर ताडपदरी झाकून वाहतूक केली जाते. 


बहुतांशी झाडे विनापरवाना तोडली जातात. नाममात्र परवाना घेतला जातो. वनविभागाच्या अशीर्वादाने बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. तालुक्यात लाकडाच्या 11 सॉ मिल आहेत. लाकूड कटाईच्या सॉ मिल संख, जत, माडग्याळ, जाडरबोबलाद, उमदी या ठिकाणी आहेत. त्यामुळे वखारभाग व वृक्ष तोडणार्‍यांचे जाळे तालुक्यात आहे. ट्रकमालक, वनविभागातील अधिकारी व दलालांचे सलोख्याचे संबंध आहेत. नाका चुकवून रोज दिवसा व रात्री ट्रक भरून लाकूड वाहतूक केली जाते. हप्ते घेऊन गाड्या सोडल्या जातात. नाके कागदावरच सुरू आहेत. प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून नाके बंद आहेत. 

तालुक्यात केवळ 6 टक्के वनक्षेत्र आहे. वृक्षतोडीमुळे वातावरणाचा समतोल राहिला नाही. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. वातावरण दूषित होऊ लागले आहे. वातावरणात समतोल रहावा म्हणून शासन विविध उपाययोजना करते. दि. १ जुलैरोजी ‘शत कोटी’ वृक्ष लागवड करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गावोगावी पोहोचविला आहे. शासनाची झाडे लागवडीची नोंद कागदावरच आहे. शत कोटी वृक्ष लागवड योजनेचे सर्वात जास्त वृक्ष लागवड केली आहे. पण दुसर्‍या बाजूला अवाजवी वृक्षतोडही सुरू आहे. 


शेतकरी बँक, सोसायटी व उसनवार घेतलेली देणी फेडण्यासाठी झाडांची विक्री करीत आहेत. कवडीमोल किमतीने झाडे घेऊन व्यापारी जास्त दराने विक्री करतात. यावर्षी भीषण दुष्काळी स्थितीने झाडे वाळली आहेत. मात्र आता शेतकर्‍यांनी सरसकट झाडांची विक्री सुरू केली आहे.


वनविभागाने पाहणी करून झाडे तोडण्यास परवानगी द्यायची आहे. झाडे तोडल्यानंतर परवाना देण्याचे प्रकार चालू आहेत. तालुक्यातील कोळगिरी हे पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु आज या गावामध्ये लाकूड व्यापार्‍यांची संख्या वाढली आहे. लाकडाची खरेदी-विक्री या गावातून होते. याकडे वन विभागाने लक्ष देऊन अवाजवी वृक्षतोड टाळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वन विभागाच्या सहकार्याने पूर्व भागातील संख, दरीबडची,पश्चिम भागातील डफळापूर, बाज,वाषाण,कंठी,बिंळूर, अंकले व जत शहर परिसरात वृक्षतोड मोठय़ाप्रमाणात सुरू आहे. लिंब, चिंच, आंबा ही झाडे तोडली जात आहेत. अनेक वर्षांची जुनी झाडे तोडल्याने हा परिसर ओसाड बनत चालला आहे.

अवाजवी वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. 1 जुलै रोजी ‘शत कोटी’ राज्यभरात 13 वृक्ष लागवड करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गावोगावी पोहोचविला आहे. शासनाची झाडे लागवडीची नोंद कागदावरच आहे. याप्रकरणाची चौकशीची मागणी होत आहे.

सॉ मिल चालकाकडून अधिकाऱ्यांना हप्ते

जत तालुक्यात सॉ मिल चालक नियम डावलून वृक्षाची बेधडक कत्तल करत आहेत.वनविभागाचे अधिकारी,कर्मचाऱ्यांना महिन्याला हप्ते दिले जात असल्याने ते हाताची घडी तोंडावर बोट या स्थितीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.