साने गुरुजी,भारत मातेचे थोर सुपुत्र

0
आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची जयंती. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील  पालगड येथे झाला. त्यांचे वडील सदाशिवराव हे पालगडचे खोत होते. लहानपणापासून साने गुरुजींचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या  शिकवणुकीचा खूप प्रभाव होता. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. साने गुरुजींच्या आईने त्यांच्या बालमनावर जे संस्कार केले त्यातूनच त्यांचा जीवनविकास झाला.

 

 

सर्वांवरती प्रेम करा हा धडा त्यांना त्यांच्या आईनेच दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमंळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वाबलंबनाचे धडे दिले.

 

 

सेवावृत्ती शिकवली. १९२८ साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले. कांदबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद अशा सर्व साहित्य प्रकारात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यात करुणा, स्नेह, प्रेम या गोष्टीचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एकप्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांनी अतिशय  साध्या आणि सोप्या शब्दात लेखन केल्याने लोकांना ते भावले. नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी श्यामची आई ही अजरामर कादंबरी लिहिली.

 

 

धुळ्याच्या तुरुंगात त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. साने गुरुजी थोर देशभक्त होते त्यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत. १९३० साली त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेतला त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. काँग्रेस नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी मिळावी यासाठीही त्यांनी आंदोलन केले होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली.

 

 

त्यातील बलसागर भारत होवो… या गीताने तरुणांना स्फुरण चढले या गीताने प्रेरित होऊन हजारो तरुण स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. या गीताचा वाढता प्रसार पाहून इंग्रज सरकारने या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त करुन या गीतावर बंदी आणली. साने गुरुजींना अस्पृश्यता, जातीपात, रूढी परंपरा, अंधश्रद्धा याविषयी कमालीची चीड होती. या गोष्टींना त्यांनी नेहमीच विरोध केला.  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांनाही प्रवेश मिळावा यासाठी १९४६ साली त्यांनी महाराष्ट्राभर दौरा केला. त्यासाठी त्यांनी उपोषण केले त्यांच्या प्रयत्नांमुळेच पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर  सर्वांसाठी खुले झाले.

 

एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी देश जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असा उद्देश या चळवळीचा होता. त्यांनी स्वतः तामिळ व बंगाली या भाषा शिकल्या होत्या.

 

१९४८ साली त्यांनी साधना हे मासिक सुरू केले. या मासिकांतून ते जनजागृती करू लागले. ११ जून १९५० रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. साने गुरुजींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

 

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.