कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नियमांचे पालन व लसीकरण गरजेचे आहे. “घ्या करुन लसीकरण.. लावा कोरोनाला पळवून” हा संदेश गीतातून, संवादातून व दृकश्राव्य जाहिरातीच्या माध्यमातून देणाऱ्या एलईडी मोबाईल व्हॅनला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच फीत कापून या प्रसिद्धी मोहिमेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उद्घाटन केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने केलेल्या या जनजागृतीपर एलईडी व्हॅनच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करुन कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण करुन घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून केलेल्या या एलईडी व्हॅनद्वारे जिल्ह्यातील 12 तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून “घ्या करुन लसीकरण लावा कोरोनाला पळवून”, कोरोनामुक्त गाव..
लसीकरण उपाय, हात धुणे हा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग, कोरोनापासून बचावासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना, महा आवास अभियान, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, राज्य शासनाची द्विववर्षपूर्ती आदी विषयांवर माहिती व जनजागृती करण्यात येत आहे.