कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी ५० टक्के माफीची संधी येत्या मार्चपर्यंत ; अंकुश नाळे

0

– १ लाख ९४ हजार शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

– फक्त ५० टक्के थकबाकी भरल्यास संपूर्ण वीजबिल कोरे

– वीजबिलांबाबत प्राप्त तक्रारीवर तातडीने कार्यवाही होणार

– गावोगावी महावितरणकडून जनजागृतीपर शेतकरी मेळावे

पुणे : कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेत पश्चिम महाराष्ट्रातील ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी १ लाख ९४ हजार ३८१ शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे.

दरम्यान, थकबाकीमुक्तीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून गावोगावी जनजागृतीपर शेतकरी मेळावे व संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना वीजबिलाबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ व सहभाग घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्री. नाळे यांनी केले आहे.

Rate Card

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, वीजबिलांतून थकबाकीमुक्ती व स्थानिक वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत कृषिपंपाच्या ३५ हजार ६१९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तर चालू व थकीत वीजबिल भरण्यातून ग्रामपंचायती व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी ३३ टक्के असा एकूण ७५५ कोटी ८८ लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. या निधीमधील वीज यंत्रणेच्या स्थानिक कामांसाठी आतापर्यंत २०२ कोटी ६७ लाख रुपये खर्चाचे ५७५७ कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहेत.

प्रामुख्याने कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण २६४४ कोटी ७९ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरूस्तीमधून १९९ कोटी ३९ लाख रूपयांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी ७९९७ कोटी ७५ लाख रूपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकीचा दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल ३९९८ कोटी ८७ लाख रूपयांची माफी मिळणार आहे.

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण ९२९ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच ४३२ कोटी ३० लाख रूपयांची माफी तसेच निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील सवलतीचे १२३९ कोटी असे एकूण १६७१ कोटी ३० लाख रूपयांची मूळ थकबाकीमध्ये सूट मिळाली आहे.

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी राज्यात आघाडी घेतली असून आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३८१ शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे. या शेतकऱ्यांकडे ५९६ कोटी ३० लाख रूपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी चालू वीजबिलाचे १०८ कोटी ३२ लाख रुपये आणि सुधारित थकबाकीमधील ५० टक्के म्हणजे २९८ कोटी २७ लाख रूपयांचा भरणा केला आहे. वीजबिल कोरे करण्यासाठी या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारातील सूट, निर्लेखन याव्यतिरिक्त थकबाकीमधील आणखी २९८ कोटी २८ लाख रुपयांच्या माफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६१ हजार ८२६ तर सातारा जिल्हा- ६० हजार ८२९, पुणे जिल्हा- ३३ हजार ८८८, सांगली जिल्हा- २७ हजार ७५०, आणि सोलापूर जिल्ह्यातील १० हजार ८८ शेतकरी वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत.

महावितरण सध्या आर्थिक संकटात असल्यामुळे ज्यांचा योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही अशा कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या मार्च २०२२ पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.