महावितरणचे ‘एक दिवस -एक गाव’ अभियान सुरू

0
Rate Card

कोल्हापूर,संकेत टाइम्स : कोल्हापूर परिमंडळ महावितरणने ग्राहकाभिमुख कारभारासाठी ‘एक दिवस -एक गाव’ हे अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्याकरीता विद्युत वितरण प्रणालीची नियमित देखभाल-दुरूस्ती करणे, ग्राहकांना नवीन वीजजोडणी देणे, ग्राहकांना अचुक वीज देयके देणे व ती नियमितपणे भरून घेणे,ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करणे इ. करीता गावपातळीवर ग्राहकांशी सुसंवाद साधला जातो आहे. राज्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात हे अभियान राबविले जाते आहे.

वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला महावितरण प्रशासनाने दर्जेदार वीजसेवेसह वीजग्राहक व महावितरण यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या दिशेने ‘एक दिवस -एक गाव’ हे सुधारणांचे एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील वीजव्यवस्थेचा कायापालट करणारी ठरणार आहे. ‘एक दिवस -एक गाव’ अभियानातंर्गत कृषी धोरण जागृती, नवीन वीज जोडणी, वीज देयक दुरूस्ती व वसूली, नादुरूस्त मीटर व  सर्व्हिस वायर बदलणे, मीटरची जागा बदलणे, कायम खंडित ग्राहकांची तपासणी, मीटर रिडींग पडताळणी, मंजुर भार व प्रत्यक्ष भार तपासणी, वीजदेयकातील नाव पत्ता बदल व दुरूस्ती, 0 ते 30 युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी, वीज वाहिन्या पाहणी व दुरूस्ती, वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, वितरण रोहित्रांची आर्थिंग करणे, वितरण रोहित्र ऑईल भरणे, वितरण रोहित्रांच्या जळालेल्या केबल बदलणे, वितरण पेट्यांची दुरूस्ती, जीर्ण वीज खांब बदलणे, वाकलेले वीज खांब सरळ करणे, वीज वाहिन्यांना स्पेसर्स, सुरक्षा जाळे लावणे, एबी स्वीच/ आयसोलेटर दुरूस्ती, पिन, डिस्क व स्टे इन्सुलेटर बदलणे, ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदविणे, गावपातळीवर महावितरण मोबाईलॲपचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिकाव्दारे समजाऊन सांगणे, थकबाकीदार ग्राहकांना नोटीस देणे असा कृतिकार्यक्रम राबविण्यात येतो आहे.

 

 

वीजग्राहकांनी, नागरिकांनी  या ‘एक दिवस-एक गाव’ अभियानात सहभागी होऊन आपल्या वीजविषयक वैयक्तिक व स्थानिक समस्या मांडाव्यात, असे आवाहन  मुख्य अभियंता श्री.परेश भागवत यांनी केले आहे.

 

दि. 11 जानेवारी 2022 रोजी इचलकरंजी विभागातील चंदूर येथे अभियानातील उपक्रम राबविले गेले. चंदूर येथील कार्यक्रमास अधीक्षक अभियंता श्री अंकुर कावळे, पंचायत समितीचे सभापती श्री. महेश पाटील, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत राठी, चंदुरच्या सरपंच सौ. अनिता माने, रुईच्या सरपंच करिश्मा मुजावर, उपकार्यकारी अभियंता श्री. सुनिल अकिवाटे, ग्रामस्थ, शाखा अभियंता व जनमित्र उपस्थित होते. श्री.कावळे यांनी चंदूर व रूई गावातील वीज खांब, वीजवाहिन्या, रोहित्रांची स्थिती उपस्थित ग्रामस्थांकडून जाणून घेतली. कृषि आकस्मिक निधीतून काय कामे करता येतील, यासंबंधाने चर्चा केली. कृषी धोरणातील 50% माफीच्या लाभाची माहिती देऊन  31 मार्च 2022 च्या मुदतीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

‘एक दिवस – एक गाव’ अभियानातंर्गत चंदूर गावातील धोकादायक रोहित्र स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले गेले. त्यासोबतच दिवसभरात 70 वीज ग्राहकांचे नादुरूस्त मीटर बदलले, 4 नवीन वीज खांब उभारले, 6 गंजलेले वीज खांब बदलले, खराब झालेल्या 2 रोहित्रपेटया बदलल्या,  गंजलेल्या 4 रोहित्र पेट्या रंगविल्या इ. देखभाल-दुरूस्तीची कामे केली गेली. कृषी धोरण -2020 अंतर्गत चंदूर येथील एक शेतकरी श्री. खंडू बाळू चव्हाण हे  1 लक्ष 46 हजार भरून थकबाकी मुक्त झाले. एकूण 10 शेतीपंप ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे 3 लक्ष 21 हजार 900 रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला.

 

 

यावेळी थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.चंदूर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे विज बिल रुपये 3 लक्ष 50 हजार रूपये भरणा केला. जयसिंगपूर विभागातील कोंडीग्रे येथे 6 रोहित्रांवरील 15 गाळ्यांचे वीज तारांचा झोळ काढण्यात आला, 3 रोहित्रांच्या वितरण पेटीचे दुरूस्ती, 6 ठिकाणी वीज खांबांचे ताण बसविले, शुन्य वीज वापर असणारे  2 मीटर बदलले, 8 वीजग्राहकांच्या मीटरची तपासणी केली, शेतीपंपाचे वीज बिल दुरूस्तीचे 11 अर्ज स्वीकारले, इ. कामे ‘एक दिवस एक गाव’ अभियानातंर्गत केली गेली. दानवाड येथेही वीजयंत्रणेच्या देखभाल – दुरूस्तीच्या कामासह वीज देयके दूरुस्त करण्यात आली.

 

17 शेतकऱ्यांनी शेतीपंपाची 2 लक्ष रूपये थकबाकी भरली. थकबाकीदार असलेल्या 95 शेतीपंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. वडगाव उपविभागात घुणकी, चंदगड उपविभागात अडकुर, हातकणंगले उपविभागात कुंभोज, इचलकरंजी उपविभागात कोरोची, सांगलीच्या तासगाव उपविभाग 1 मधील शिरगाव, शिराळा उपविभागातील तडवळे आदी ठिकाणी ‘एक दिवस -एक गाव’ अभियानातून विविध कामे करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.