प्रेम शब्दांत पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याची व्याख्या अपुरीच राहते.प्रेम ही निसर्गाने मनुष्याला दिलेली अत्यंत सुंदर अशी संवेदना आहे. ती शब्दांत व्यक्त करता येत नाही,ती प्रत्यक्ष अनुभवीच लागते. जे प्रेमात पडले आहेत,त्यांना त्याचा अनुभव माहित असतो.एकमेकांच्या आखंड प्रेमात बुडालेल्या युगलांना आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेला असतो.त्यांना दुसरं काही दिसत नाही.मात्र त्यांचं वागणं समाजाला रुचत नाही. कारण आपल्याकडे आजही प्रेमाला म्हणावी तेवढी समाज मान्यता मिळालेली नाही. प्रेमाचा उघड स्वीकार केला जात नाही.
प्रेमी युगलांकडे समाज वेगळ्या नजरेने बघतो. आज युवा वर्ग प्रेमविवाहाला मान्यता देत असला तरी समाज,जात-धर्म याला आडकाठी घालत असतात.त्यामुळे प्रेमविवाहाचा प्रवास करत असताना प्रेमीयुगलांना मोठी दिव्ये पार पाडवी लागतात.त्या दिव्यातून पार पडला तरी दुसरा अडथळा पुढे वाट पाहातच असतो. इथे एकमेकांची सुख-दु:खे स्वीकारत, दोष, खरे चेहरे यांच्याकडे कानाडोळा करत आहे, आहे तसा एकमेकांचा स्वीकार करत गेल्यास प्रेमविवाह यशस्वी होतो, मात्र इथे नेमके हेच आडवे येते. आणि प्रेमविवाहाला सुरुंग लावत ही मंडळी एकमेकांपासून दूर होतात.
प्रेम आणि त्याची परिणती विवाहात झाल्यानंतर या दोन्ही परिस्थितीत प्रचंड तफावत आढळते. वास्तविक प्रेमात एकमेकांना जपण्याचा आणि आपले दुर्गुण झाकून चांगली बाजू समोरच्या व्यक्तीपुढे ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. कधी कधी काही दोषांक़डे दुर्लक्षही केले जाते. पुढच्याला इम्प्रेस करण्याचा खटाटोप केला जात असतो. मात्र लग्नानंतर नेमके उलटले दिसायला लागते. दोष म्हणजे खरे चेहरे उघड व्हायला लागतात. मग धूसफूस,भांडणे,वितंडवाद आणि शेवटी घटस्फोट, असे काहीतरी भयंकर घडते. प्रेमाचा अंत मोठा दारुण होतो. आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय चुकीचा घेतल्याचा पश्चाताप व्हायला लागतो आणि आयुष्यभर ती सल सलत राहते.त्यामुळे हे टाळण्यासाठी प्रेमात पडतानाच मुळी डोळसपणे पडण्याची गरज आहे.
प्रेमात पडल्यावर खरेच ते प्रेम आहे का की शारीरिक आकर्षण आहे, हेही तपासून घ्यायला हवे आहे. आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय विचारानेच घ्यायला हवा. प्रेमविवाह करीत असताना कदाचित आपण घराच्यांनाही मुकलेलो असतो.काहींच्या मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या असतात. असे असताना लग्नानंतर पश्चाताप होत असेल तर मोठे भयंकर प्रकरण आहे, असे म्हणावे लागेल.मनापेक्षा बुद्धीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. इतरांच्या ठेस लागण्यावरून शिकता तर आलेच पाहिजे,पण प्रेमात पडतानादेखील सगळ्या दृष्टीकोनातून विचार केला गेला पाहिजे. लग्नानंतर दोष-गुण स्वीकारत अहंभाव न ठेवता एकमेकात मिसळून गेल्यास त्यांचाइतका सुखी संसार दुसर्या कुणाचा असणार नाही. म्हणजे स्वप्नात वावरण्यापेक्षा सत्यात, चित्त भानावर ठेवत जगता आले पाहिजे.
प्रेमविवाहात युगुल जोडपे एकमेकांना बर्याच प्रमाणात ओळखत असतात. त्यांच्या आवडीनिवडी,त्यांची मते,त्यांचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण एकमेकांना माहित असतो. त्यामुळे प्रेमविवाह ठरवून केलेल्या लग्नापेक्षा जास्त काळ टिकायला पाहिजे, असेच आपल्याला वाटते. अर्थात सगळेच प्रेमविवाह मोडतात, असा धरता कामा नये. एकमेकांना समजून घेऊन वागणारी प्रेमविवाहीत जोडपी सुखाने संसार करतात,याची समाजात मोठी उदाहरणे आहेत. मात्र बहुतांश प्रेमविवाह विफल झालेली आढळतात. उलट ठरवून केलेली लग्ने ही जास्त काळ टिकतात, यशस्वी होतात. या विवाहातील युगल एकमेकांना फारसे समजून घ्यायला संधी मिळालेली नसते.कधी कधी तर एकमेकांना प्रत्यक्षात पाहिलेलीही नसतात. घरच्यांच्या पसंदीनुसार केलेल्या विवाहात मुलगा अथवा मुलगी बहुतेक अनोळखीच असतात. त्यामुळे एकमेकांच्या आवडी-निवडी, मते,दृष्टीकोण माहीत असणे शक्य नसते. असे असताना ठरवून केलेले विवाह जास्त यशस्वी होतात, असे आढळून येते.
घटस्फोटांची प्रकरणे पाहिल्यास आपल्याला त्यात प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचीच अधिक दिसून येतात. असे का घडते? ही युगल मंडळी एक तर स्वप्न रंजनात वावरलेली असतात किंवा ती एकमेकांना नीट ओळखू शकलेली नसतात. सत्य काय आहे, याची जाणीव लग्नानंतरच येते.पण तोपर्यंत त्यांना उशीर झालेला असतो. प्रेमाच्या विहारात त्यांनी कसलाच विचार केलेला नसतो. लग्नानंतर पोटाला काय घालणार,याची चिंता त्यावेळेला असत नाही. त्यामुळे नंतर मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रेमविवाह करताना घरच्यांच्या विरोध डावलेला असतो. घरातली चोरी करून पळून जाऊन लग्न केलेले असते.चार चैन केल्यावर जवळचे पैसे संपले की, ही मंडळी ताळ्यावर येतात. पण नाईलाज म्हणून एकमेकांसोबत राहावे लागते. परिस्थिती अगदीच बाहेर गेली की कोर्टाची पायरी चढली जाते. या वळणावर यायला बरीच कारणे असतात. यातला पहिला मुद्दा म्हणजे यांचे एकमेकांवर खरे प्रेम नसतेच.
एकमेकांच्या बाह्यरुपावर भाळून किंवा पैसा, धाडसीवृत्ती यावर फिदा होऊन विवाह केलेला असतो. लग्नापूर्वी एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे, हे दाखवण्याच्या नावाखाली आपल्या वाईट सवयी,दोष दडवले जातात. चांगल्या गोष्टीवरच अधिक फोकस केला जातो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पसंद करावे म्हणून त्या व्यक्तीला आवडेल ते करण्याचा प्रयत्न केला जातो. कामधाम न करता घरच्यांच्या पैशावर गमजा करणारी,मुलींना इंप्रेस करणारी मुलं लग्नानंतर संसार करायची अक्कलसुद्धा नसतानादेखील केवळ मुलींना फशी पाडण्याचाच अधिक आटापिटा करत असतात. मुलीही त्याच्या एखाद्या गोष्टीवर फिदा होऊन आपला जीव ओवाळून टाकायला एका पायावर तयार होतात.”
मुला-मुलीने दुसर्या आवडते म्हणून तसे वागण्याचा प्रयत्न करू नये. आपण जसे आहे, तसे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खोट्या इम्प्रेशनमुळे आपण एकमेकांना फसवत असतो. हा फसवेपणा फार काळ टिकत नाही. आपल्याला आवडणारी व्यक्ती तिच्या गुण-दोषांसह स्वीकारणं म्हणजे प्रेम. त्याला किंवा तिला खरे सांगितले तर ती अथवा तो आपल्याला सोडून जाणार नाही ना याची भिती असते. पण हाच काळ महत्वाचा आहे. आपल्या जोडीदाराला न आवडणार्या गोष्टी लपवून लग्न केल्यास तसेही लग्नानंतर जोडीदार सोडून जाणारच असतो. त्यामुळे अगोदरच निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण ज्याच्यावर प्रेम केले, त्याला आपल्या सगळ्या गोष्टींचा परिचय व्हायला हवा. तरीही तिने किंवा त्याने नकार दिला तरी हळवे होऊ नये किंवा संतापू नये. प्रेम जपले पाहिजे. त्याला किंवा अंतर देताना प्रेमाची ज्योत तेवत ठेवावी. खंबीर मन ठेवावे. मात्र जोडीदाराला फसवून त्याच्याशी विवाह करू नये.
अलिकडच्या काळात डेटिंगचे प्रस्थ वाढले आहे. डेटिंगला गेल्यावर मुलींनी मुलांना जास्तीत जास्त ओळखून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्याबरोबरचे वागणे आणि दुसर्याबरोबरचे वागणे,यातला फरक जाणून घ्यावा.मुलांच्या विविध व्यसनाचाही मुलींनी विचार करायला हवा. मुलगा नेमके काय करतो,कुठे जॉब करतो,याची खातरजमा करायला हवी. प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असेल तर मुलगा विवाहानंतर काय निर्णय घेणार आहे? पळून जाऊन लग्न केल्याने ओढवणारी परिस्थिती याचा विचार केला पाहिजे. लग्नानंतरचा घटस्फोट मुलासाठी फारसा धोकादायक ठरत नाही, मात्र घटस्फोटित महिला म्हणून समाजात वावरताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मुलींसाठी हा मोठा कठीण काळ असतो. त्यामुळे मुलींना प्रेमविवाह करण्यापूर्वी डोळसपणे वागले पाहिजे. कारण लग्न म्हणजे नुसता खेळ नसतो. दोन शरीरांबरोबरच दोन मनांचेदेखील मीलन होत असते. प्रेमात दोन मने फक्त विश्वासाच्या नाजूक धाग्यांनी जोडलेली असतात. या विश्वासाला तडा जाऊ न देणे पूर्णपणे प्रेमवीरांच्या हातात असते. तडा गेलेली काच पुन्हा सांधली तरी काचेची दुभंगणारी रेघ तशीच राहते.
– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली