जतेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ; जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी | बैठक संपन्न
सांगली (जि.मा.का.) : थोर महापुरूष, महनिय व्यक्ती यांचे पुतळे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाने नियमावली ठरविली आहे. तसेच पुतळा बसविण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सन 2017 पासून स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेले आहेत. पुतळे स्थापन करताना राष्ट्र पुरूषांचा योग्य सन्मान राखला जावा यासाठी पुतळा समितीने न्यायालय व शासनाने दिलेल्या मागदर्शक नियमांची व विविध परवानग्यांची पूर्तता करावी. जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी पुतळा समितीने सर्व परवानग्यांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर,डिवायएसपी रत्नाकर नवले,माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते.
