छ.शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा ; तुकाराम बाबा | पोलीस बंदोबस्ताबाबत केली नाराजी व्यक्त

0
2

जत,संकेत टाइम्स : मागील सोळा वर्षापासून जतकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतीक्षेत आहेत. लोकवर्गणीतून उभा राहत असलेला हा पुतळा जतमध्ये दाखल झाला आहे, नजरेच्या समोर आहे.पण पुतळा नियोजित जागी बसविण्याऐवजी पूतळयावरून जतला छावणीचे स्वरूप आले आहे हे बरोबर नाही. शिवरायांचा पुतळा बसला पाहिजे ही लोकभावना आहे, पुतळा बसविण्यास कोणाचा विरोध नाही, आजी, माजी आमदारांनीही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे. तेव्हा लोकभावनेचा आदर करत प्रशासनानेच पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

तुकाराम बाबा महाराज यांनी जत येथे दाखल झालेल्या शिवरायांच्या पुतळयाचे पूजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवरायांच्या पुतळयाविषयी आपली भावना व्यक्त करत प्रशासनाला आवाहन केले.
तुकाराम बाबा म्हणाले, एक एक रुपाया गोळा करून लोकवर्गणीतून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बनविण्यात आला आहे. पुतळयामध्ये जतकरांची भावना गुंतलेली आहे. पुतळा तयार झाल्यानंतर वास्तविक वाजतगाजत पुतळा बसविण्यात यायला हवा होता पण इथे उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. वाघा बॉर्डरवर, सीमेवर जशा बंदोबस्त असतो तसाच बंदोबस्त जतमध्ये लावण्यात आलेला आहे. हजारो पोलीस जतमध्ये दाखल झालेले आहेत. पुतळा, चबुतरा, शहरातील मुख्य चौकाला छावणीचे स्वरूप आले आहे. जतच्या जनतेने नेमका काय गुन्हा केला आहे, जतमध्ये जातीय दंगल घडली की घडणार आहे असेच चित्र निर्माण झाले आहे. शिवरायांचा पुतळा बसविण्यावरून प्रशासनाने जो तगडा बंदोबस्त लावलेला आहे तो पूर्णतः चुकीचा असून जतबद्दल चुकीचा संदेश राज्यभर जात असल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
जतला शिवरायांचा जो पुतळा बसविण्यात येणार आहे त्यावरून वाद होणे चुकीचे असल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले, शिवरायांचा पुतळा हा पूर्वी ज्या ठिकाणी पुतळा होता तेथेच बसविण्यात येणार आहे असे असताना प्रशासनाला त्याला पुन्हा परवानगी आणा म्हणणे कितपत योग्य आहे. जतकर नवीन पुतळा बसवित आहेत, लोकवर्गणीतून पुतळा उभा राहतो म्हटल्यावर प्रशासनाने कागदी घोडे नाचवायला नको होते. जतच्या आजी, माजी आमदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत पुतळा बसवू द्या अशी विनंती केली आहे पण जिल्हाधिकारी यांनी त्यास परवानगी न दिल्याने आज जतला छावणीचे रूप आले आहे. जतला पुतळा बसला पाहिजे ही सर्वांची भावना आहे, त्याला कोणाचा विरोध नाही तेव्हा प्रशासनाने दोन पावले माघार घेत पुतळा बसविण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here