एकाच वेळी ३८ जणांना फाशीची शिक्षा   

0

 

 

फाशीची शिक्षा आपल्या देशात दुर्मिळ मानली जाते. खून, बलात्कार यासारख्या मोठ्या गुन्ह्यातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. रेअररेस्ट ऑफ रेअर गुन्हेगारी प्रकरणातच फाशी सुनावली जाते. त्यामुळे जर कोणाला फाशीची शिक्षा झाली तर ती मोठी घटना समजली जाते त्यामुळे  एकाच वेळी ३८ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली तर ती खूप मोठी घटना समजली पाहिजे. २००८ साली अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी आढळून आलेल्या ३८ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली तर याच गुन्ह्यात ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

एकाच वेळी ३८ जणांना फाशी सुणावण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. या आधी १९९८ साली टाडा न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात २६ जणांना एकाच वेळी फाशी सुनावली होती. २००८ साली गुजरातच्या अहमदाबाद शहरात साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. सरकारी तसेच पालिका हॉस्पिटल, बस स्थानक, दुचाकी, चारचाकी वाहनांचे पार्किंग, मुख्य बाजारपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी एकाच वेळी साधारणपणे २१ बॉम्ब ब्लास्ट करण्यात आले. १९९२ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतरची ती सर्वात मोठी बॉम्बस्फोट मालिका होती. यात ५६ लोकांनी आपला जीव गमवला होता तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी आयोध्येवरून परतणाऱ्या कार सेवकांना गोध्रा रेल्वेस्थानकावर डब्यांना आग लावून जाळून टाकल्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत २००० हुन अधिक लोक मारले गेले त्याचा बदला म्हणून हिजबुल मुजाहिद्दीन व स्टुडंट इस्लामिक इंडिया ( सिमी ) या दोन संघटनेने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या बॉम्बस्फोट मालिकेनंतर या दोन्ही संघटनांवर केंद्र सरकारने कायमची बंदी घातली आहे. या बॉम्बस्फोट मालिकेचे पडसाद देशभर उमटले होते. या बॉम्बस्फोट मालिकेचा  तपास करण्यासाठी केंद्र सरकारने एसआयटी नेमली होती. एसआयटी ने या बॉम्बस्फोट मालिकेची कसून तपास करून ७७ जणांवर खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी आता १४ वर्षानंतर पूर्ण झाली असून त्यातील दोषींना फाशी व जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

न्यायला उशीर होतो, परंतु आज ना उद्या न्याय होतोच या म्हणी नुसार बॉम्बस्फोट मालिका घडवून ५६  निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या ३८ जणांना फाशीची शिक्षा आणि ११ जणांना जन्मठेप झालीच. या निकालाने या बॉम्बस्फोट मालिकेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना उशिरा का होईना पण न्याय मिळाला. यासाठी माननीय न्यायालयाचे आभारच मानावे लागेल. या रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्हेगारी प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात फाशीची शिक्षा झाल्याने भीषण अशा अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेची आठवण पुन्हा एकदा जागी झाली.

Rate Card

श्याम ठाणेदार   

दौंड जिल्हा पुणे   

९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.