प्रतिभाशाली बुद्धीबळपटू आर.प्रज्ञानंद           

0
प्रतिभेला वयाचे बंधन नसते असे म्हणतात किंबहुना प्रतिभा वयावर ठरलीही जात नाही. काही मुले अशी असतात की ती अशी काही कामे करून जातात की जी कामे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले व्यक्तीही करू शकत नाही. त्यालाच प्रतिभा असे म्हणतात. ही मुले इतकी हुशार कशी असतात याचे उत्तर वैज्ञानिकांनाही मिळालेले नाही. काहीजण  प्रतिभा ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे असे मानतात.

 

अर्थात अशी प्रतिभाशाली मुले खूप कमी असतात.  ती अशी काही कामे करून जातात की ज्याच्यामुळे त्यांचेच नाही तर त्यांच्या आई वडिलांचे, शिक्षकांचे इतकेच काय तर देशाचेही नाव उज्ज्वल होते. अशाच एका अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाने आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या प्रतिभाशाली मुलाचे नाव आहे आर प्रज्ञानंद. आर प्रज्ञानंद हा भारताचा युवा  बुद्धिबळपटू आहे. त्याचे वय अवघे सोळा वर्ष आहे.

 

अवघ्या सोळा वर्षाच्या या युवा बुद्धिबळपटूने मागील आठवड्यात अशी कामगिरी केली की जी भल्याभल्या बुद्धिबळपटूंना जमली नाही. आर प्रज्ञानंदने ऑनलाइन खेळवण्यात आलेल्या ‘ इंटरनॅशनल रॅपिड चेस एअरविंग्स मास्टर्स स्पर्धेत’ जगातील पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याला पराभूत केले. कार्लसन सारखा जगातला अव्वल बुद्धिबळपटू प्रज्ञानंदच्या चालीपुढे हतबल ठरला.

 

त्याचा खेळ पाहून जगभरातील बुद्धिबळपटूने त्याचे कौतुक केले. जगातील पहिल्या क्रमांकाच्या बुद्धिबळपटूला पराभूत करणे ते ही वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ही खूप मोठी कामगिरी आहे. भारताचा अव्वल बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यानेही त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले आहे. आर प्रज्ञानंद याने या विजयाने आपणच विश्वनाथन आनंदचा वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे. आर प्रज्ञानंदचे पूर्ण नाव रमेशबाबू प्रज्ञानंद असे आहे.

 

त्याचा जन्म  १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे झाला. प्रज्ञानंद याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने बुद्धिबळपटू होऊ नये असे त्याच्या वडिलांना वाटत होते. पण त्याची बुद्धिबळातील प्रगती पाहून त्याच्या वडिलांना माघार घ्यावी लागली.  मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे वयाच्या अवघ्या  दहाव्या वर्षी त्याने  त्याने जागतिक  युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. २०१६ मध्ये प्रज्ञानंदने इतिहास रचला.  २०१६ मध्ये प्रज्ञानंद १० वर्ष  १० महिने १९ दिवसांचा असताना इतिहासातील सर्वात तरुण  आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. त्याला प्रथमच ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळाले.

 

प्रज्ञानंद जेंव्हा १२ वर्षाचा होता तेंव्हाच त्याने  दिगग्ज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचा रेकॉर्ड मोडीत काढून ग्रँडमास्टर हा  पुरस्कार मिळवला होता. आर प्रज्ञानंदच्या या विजयाने देशाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. भविष्यात तो भारताचाच नाही तर जगातला अव्वल बुद्धिबळपटू बनणार यात शंका नाही. आर प्रज्ञानंदचे अभिनंदन व त्याला पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा ! श्याम  ठाणेदार

 

दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.