गुलाल’ने लाभले ‘कोल्हापूरचे महापौर’ना चार चाँद

0
कोल्हापूर : ‘विजयाचा गुलाल एकाचा आणि सत्ता दुसऱ्याची’अशा शब्दांत राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगावर रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाउ खोत यांनी साधलेला निशाणा, पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘गुलाल’ पुस्तकातील लिखाणाचा आधार घेत खोत यांच्या विधानाला ‘भाजपने जे पेरलं तेच उगवलं’या शब्दांत दिलेलं प्रत्युत्तर, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांनी यांनी  पालकमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केलेली टोलेबाजी, धनंजय महाडिकांनी शहर विकासासाठी माजी महापौरांनी पुढाकार घेण्याविषयी घातलेली साद आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांनी पत्रकारितेसह सामाजिक स्थिती, राजकारणासंबंधी केलेले मुक्त चिंतन अशा वातावरणात शुक्रवारी (ता.२५ फेब्रुवारी) सायंकाळी ‘गुलाल’ व ‘कोल्हापूरचे महापौर’ या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रंगला.

 

 

ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी लिखित ‘गुलाल’ आणि गेल्या ५० वर्षातील कोल्हापूरच्या महापौरांच्या कारकिर्दीवर आधारित व पत्रकार गुरुबाळ माळी, पत्रकार आप्पासाहेब माळी, पत्रकार सतीश घाटगे लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने महापालिकेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत शहर विकासात योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा जणू स्नेहमेळाच झाला. आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, प्रकाशक अमेय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शाहू स्मारक भवन येथे हा समारंभ झाला.
 याप्रसंगी पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या पत्रकारितेला तीस वर्षे झाल्याबद्दल माजी महापौर संघटना कोल्हापूरतर्फे शाहू महाराज, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील आदींच्या हस्ते त्यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देत सपत्नीक सत्कार  झाला. माजी महापौर सई खराडे, निलोफर आजरेकर यांच्या हस्ते विद्या गुरुबाळ माळी यांचा सत्कार झाला.

 

या समारंभात सर्वच मान्यवरांनी ‘माळी यांच्या तीन दशकातील पत्रकारितेचा मुक्तकंठाने गौरव केला. ‘माळी यांनी तीस वर्षाच्या कालावधीत ध्येयवादीवृत्तीने पत्रकारिता केली. समाजातील चांगुलपणाचे कौतुक आणि वाईट प्रवृत्तीवर प्रहार केला. कोल्हापुरात पत्रकारिता करत त्यांनी राज्यपातळीवर छाप उमटविली’ असे गौरवोद्गार सर्वच वक्त्यांनी काढले.

 

……………….
विजयाचा गुलाल आणि सत्ता वेगवेगळी समीकरणे…
पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या ‘गुलाल’ पुस्तकातील लिखाणाचा संदर्भ घेत आमदार सदाभाउ खोत यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील तीन पक्षांचे आघाडी सरकार आणि सर्वाधिक आमदार निवडून येउनही विरोधी बाकावर बसलेला भाजप याकडे निर्देश करत खोत यांनी ‘सध्याचे राजकारण खूप वेगळे आहे. पूर्वी ज्याच्या अंगावर विजयाचा गुलाल तो सत्ताधीश. आता मात्र विजयाचा गुलाल उधळूनही सत्ता दुसऱ्याचा अशी स्थिती आहे. विजयाचा गुलाल एकाचा आणि सत्ता दुसऱ्याची’असे म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.

 

……………………
मंत्र्यांनीच वेधले हद्दवाढीकडे लक्ष
पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘गुलाल’व ‘कोल्हापूरचे महापौर’या दोन्ही पुस्तकातून इतिहासाची पाने उलगडतील. या पुस्तकाद्वारे राजकारण आणि कोल्हापूरच्या आतापर्यंतच्या महपौरांचा कारकिर्दीचा ठेवा जतन झाला आहे. त्याद्वारे समाजाला कोल्हापूरच्या गेल्या ५० वर्षाची ओळख घडेल.’ माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कॉलेज जीवनापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. कोल्हापूरच्या विकासात माजी महापौरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा भविष्यातही शहर विकासासाठी व्हावा असे नमूद केले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहर विकासाशी निगडीत प्रकल्प, कोल्हापूरची हद्दवाढ हे विषय माजी महापौर संघटनेने हाती घेण्याचे आवाहन केले.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘लोकशाहीत पत्रकारितेला अनन्य साधारण महत्व आहे. लोकशाहीचा हा चौथा खांब आहे. अन्य क्षेत्राप्रमाणे पत्रकारितेचे स्वरुपही बदलत आहे. सत्तेच्या बाजूने प्रसारमाध्यमे असे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र कोल्हापूरची पत्रकारिता चांगली आहे. चांगल्या समाजासाठी चांगली पत्रकारिता आवश्यक आहे.’
माजी महापौर आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार गुरुबाळ माळी यांनी पुस्तक निर्मितीची प्रक्रिया उलगडली. पत्रकार ताज मुल्लाणी, शिक्षक संदीप मगदूम, पत्रकार उद्धव गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी आभार मानले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.