एका आदर्श आजीबाईंचा महावितरणकडून सन्मान

0
3
कोल्हापूर : ‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ ही  जागरूकता एका ८० वर्ष वयाच्या आजीनं बाळगली. चालू महिन्याचं वीज बिल हातात पडलं आणि ते आजीबाईंनी धडपड करीत तत्परतेने भरलं. ‘त्या’ कर्तव्यतत्पर आजीबाईंचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे ‘एक आदर्श ग्राहक’ या नात्याने सन्मान केला.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील श्रीमती सुशीला बाबुराव पाटील या ८० वर्षांच्या आजी सकाळी सकाळी तेथील महावितरणच्या शाखा कार्यालयात येऊन थबकल्या. त्यांच्या हातात चालू महिन्याचे वीज बिल होतं. शनिवारचा सुट्टीचा दिवस, बँक बंद असल्याने धडपड करीत त्या शाखा कार्यालयात आल्या होत्या. तिथे त्यांनी माझं वीज बिल भरून घ्या, असा हट्ट केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आजीबाईंकडून वीज बिलाचे पैसे घेत ऑनलाईनद्वारे आजींचे बिल भरून टाकले. तर कोरोना काळातसुद्धा न तटवता बिल भरलंय, असं सांगून वेळेत वीज बिल भरलं पाहिजे, असा कानमंत्र थकबाकीदार ग्राहकांसाठी ‘त्या’ देऊन गेल्या.
एकीकडे वीज सेवेसाठी अहोरात्र राबून थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज कर्मचाऱ्यांना दारोदार फिरण्याची वेळ येते. काहीं वीज ग्राहक तर आज भरतो, उद्या भरतो ,अशी चालढकल करून पुन्हा हमरीतुमरीवर ही येतात. दुसरीकडे वेळेत वीज बिल भरण्यासाठी या वयातही थेट कार्यालय गाठणाऱ्या आजीबाईं ! वीज कर्मचाऱ्यांना बळ देऊन जातात.
महावितरणच्या जयसिंगपूर विभागातील वडगाव उपविभागाच्या वतीने उस्फुर्तपणे आजींबद्दलची कृतार्थता व्यक्त करण्यासाठी कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांचे हस्ते आजींना साडी-चोळी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपविभागीय अभियंता सचिनकुमार जगताप,भादोले गावचे सरपंच आनंदा कोळी, शाखा अभियंता इरफान सनदे, सहाय्यक अभियंता सागर हुजरे, युवराज इंदलकर यांच्यासह वीज कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here