रशियाशी असलेली मैत्री टिकवण्यासाठीच भारत तटस्थ             

0
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभर रशियाचा निषेध सुरू आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. रशियाचा युक्रेन वरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडला गेलेला ठराव दोन तृतीयांश मतांनी मंजूर झाला मात्र या ठरावाच्या वेळी भारत तटस्थ राहिला. रशिया विरोधात मांडण्यात आलेल्या आठवड्याभरातील तिसऱ्या ठरावाच्या वेळी भारताने तटस्थ भुमिका स्वीकारुन आपल्या अलिप्तवादी परराष्ट्र धोरणाचा पुरस्कार केला आहे.

 

पंडित नेहरूंपासून आपले हेच धोरण आहे. नरेंद्र मोदींनीही त्याच धोरणाचा अवलंब केला आहे. रशिया युक्रेन वादात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेणे याचा अर्थ भारत अप्रत्यक्ष रशियाच्या बाजूने आहे असाच होतो. कारण भारताची रशिया सीबत मैत्री आहे. रशिया हा भारताचा सर्वात जुना मित्र आहे. ज्या ज्या वेळी भारतावर संकटे आली त्या त्या वेळी रशियाने भारताला मदत केली.

 

गोवा मुक्तीच्या बाबतीत रशियाने भारताला मदत केली नसती तर भारताची गोव्यावरील लष्करी कारवाई बेकायदेशीर ठरवली गेली असती गोवा कायमचा पोर्तुगीजांकडे गेला असता. १७ डिसेंबर १९६१ च्या रात्री जेंव्हा भारताने गोव्यावर लष्करी कारवाई केली तेंव्हा ताबडतोब पोर्तुगाल युनो मध्ये गेला होता.
१८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने केलेल्या लष्करी कारवाईचा विषय युनोमध्ये घेण्यात आला. या बैठकीत जगातील सर्व प्रमुख देश पोर्तुगालच्या बाजूने राहिले, पण केवळ रशिया भारताच्या बाजूने राहिला, रशिया भारताच्या बाजूने राहणे महत्वाचे होते कारण त्याला व्हेटो पॉवर होता. त्यामुळे भारतावर कारवाई होऊ शकली नाही. विशेष म्हणजे अमेरिका,  इंग्लंड, फ्रांस, चीन हे देश भारताविरोधात होते.
केवळ रशियाने व्हेटो पॉवर वापरल्याने  हा ठराव बारगळला आणि गोवा भारतात आला. त्यानंतरही रशियाने अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारताची उघडपणे बाजू घेतली आहे.   भारत पाकिस्तान युद्धात तर रशिया  कायम भारताच्या बाजूने राहिला आहे. १९७१ च्या युद्धात जेंव्हा अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली तेंव्हा रशिया भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. १९९९ च्या कारगिल युद्धातही रशियाने भारताला पाठिंबा दिला. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने अणू चाचण्या केल्या.

 

या अणू चाचण्यानंतर अनेक देशांनी भरतावर निर्बंध लादले. रशियाने निर्बंध लादणे तर सोडाच पण  स्वसंरक्षणासाठी भारताला अणू चाचण्या घेण्याचा अधिकार असल्याची ठाम भूमिका घेतली. काश्मीर प्रश्नातही रशियाने भरताचीच बाजू घेतली आहे. अगदी अलीकडे काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम भारताने रद्द केले तेंव्हाही रशियाने त्याचे समर्थन केले. रशिया हा आज संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात आपला सगळ्यात मोठा भागीदार देश आहे. रशियाने भारताला अनेक अत्याधुनिक शस्त्रे पुरवली आहेत.

 

आज भारताने अवकाश क्षेत्रात जी उडी मारली आहे त्यात रशियाचा मोठा वाटा आहे. गगनयान, चांद्रयान मोहिमेत रशियाच आपल्याला मदत करत आहे. शिवाय रशिया भारताला इंधन आणि गॅस पुरवठा करणारा देश आहे रशियाला दुखावले तर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. रशिया सारख्या सच्च्या मित्राला दुखावले तर चीन सारखा कपटी देश त्याचा लाभ घेईल. भारत रशियाचे संबंध बिघडले तर चीन रशियाच्या आणखी जवळ जाईल आणि ते भारताच्या दृष्टीने खूप धोक्याचे ठरेल. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे स्वतःहून स्वतःचा पायावर धोंडा पाडून घेणे होय. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देश सध्या भारताच्या विरोधात उभे आहेत अशावेळी रशिया सारखा एक चांगला मित्र गमावणे आपल्याला परवडणारे नाही.

 

पाश्चिमात्य देशांच्या नादी लागून रशिया आणि युक्रेनच्या वादात न पडण्याची सरकारची भूमिका अतिशय योग्य आहे. सध्यातरी तटस्थ राहणे हेच आपल्या हिताचे आहे.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.