आपल्या वाट्याचं आकाश शोधताहेत महिला

0
1
तुम्ही कुठल्याही खेड्यात, लहान शहरात किंवा महानगरात राहत असाल तर तुम्ही जरा तुमच्या आजूबाजूला नजर  टाका.जाणीवपूर्वक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, या परिसरात मोठा बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. रस्त्यावर सायकल, स्कूटी, बाइक आणि चारचाकी गाड्या चालवताना तुम्हाला तरुणी किंवा स्त्रिया पाहायला मिळतील. शाळा-कॉलेजात, दवाखान्यात डॉक्टर आणि नर्स यांच्या रुपात महिला दिसतील. खेळाच्या मैदानात बॅडमिंटन,  कुस्ती, कराटे,  हॉकी,  क्रिकेट,  टेनीस, नेमबाजी असे किती तरी  खेळ महिला खेळताना दिसतील.

 

ऑफिसमध्ये, मॉल्समधल्या दुकानांमध्ये, सिनेमागृहांच्या काँऊटरवर इतकेच नव्हे तर टोल नाक्यावरदेखील पैसे गोळा करायला आपल्याला महिलाच दिसतील. हे चित्र आपल्याला हेच सांगतं की, महिला आता कुठेच मागे नाहीत. त्या आपल्याला सर्वच ठिकाणी अगदी आत्मविश्‍वासाने काम करताना, वावरताना दिसतात. आता हेच चित्र पाचव्या किंवा सहाव्या दशकात जाऊन पाहिल्यावर  काय दिसेल? त्यावेळेला आपल्याला मुली किंवा स्त्रिया काही मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळत होत्या.

 

क्वचितच कधी तरी एकादी मुलगी किंवा स्त्री स्कूटी किंवा चार चाकी गाडी चालवताना दिसली असेल.  दुकानाच्या कॉऊंटरवर मुलींना बसवणं, हा एक प्रकारे गुन्हाच आहे, असे मानलं जात होतं.  ऑफिसमध्येदेखील महिलांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. म्हणजेच संपूर्ण समाजात काम करणार्‍या महिलांची टक्केवारी फारच कमी होती.

 

महिलांचे जग हे चूल आणि मूल या मर्यादेतच होतं. अर्थात त्यावेळेला आपण स्त्री-पुरुष समानता या दृष्टीकोनातून पाहिलं असतं तर संपूर्ण समाजातलं एक विचित्र असं असंतुलन आपल्याला पाहायला मिळालं असतं. असं वाटत होतं की, सगळं काही पुरुषांच्या हातात आहे. सगळं काही पुरुषांच्या संचलनाने चालत आहे. स्त्रियांची जागा आपल्याला फक्त घरातच पाहायला मिळत होती. पण आज पूर्ण चित्रच पालटलं आहे. अजून वेगाने यात बदल होतोय. आपल्या जीवनाला, कुटुंबाला, देश आणि या जगाला आणखी बेटर बनवायचं असेल तर संतुलन महत्त्वाचं आहे.अन्यथा निम्म्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून बेटर जग बनवण्याचा विचार करणं शक्य आहे का? भारतीय समाजात आलेल्या गेल्या काही वर्षातल्या बदलामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, स्त्री बदलत आहे. आता ती चार भिंतीच्या आत राहायला तयार नाही. ती जागृत होत आहे. आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करायला ती सज्ज झाली आहे. ती परिस्थिती बदलवून टाकत आहे.

 

आपल्या देशात, समाजात तर विविध क्षेत्रात वाढत असलेली महिलांची भागिदारी एका चांगल्या संतुलित जगाचे चित्र समोर आणताना दिसत आहे.
या जगाला बदलवायचे असेल आणि निर्णायक परिस्थितीत आणायची असेल तर महिलांना राजकीयदृष्ट्या जागृत आणि सक्रिय करण्याची आवश्यकता असल्याचे अनेकदा, विविध स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या आवडीचे सरकार निवडावे लागेल आणि स्वत: पुढे येऊन राजकारणात आपल्यासाठी स्थान निर्माण करावे लागेल. आणि एक चांगले संकेत आहेत की, गेल्या काही वर्षांमध्ये महिलांची मतदान प्रक्रियेतली टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये फक्त महिलांच्या मतदान टक्केवारीत वाढ झाली नाही तर कित्येक ठिकाणी या महिलांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे.

 

 

राज्याचा विचार थोडा बाजूला ठेवू पण, लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदान टक्केवारीत सुखद वाढ झाल्याची आकडेवारी आपल्याला सांगते. 2009 नंतर यात दखलपात्र वाढ झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत  67 टक्के पुरुषांच्या तुलनेत 65 टक्के मतदान महिलांनी केले आहे. आपल्याला आश्‍चर्य वाटेल, 1967 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महिलांचे मतदान पुरुषांच्या तुलनेत  11 टक्क्यांनी कमी होते. 2014 मध्ये हे प्रमाण 1.8 वर आले. याचाच अर्थ महिला आता आपल्या मतदानाची ताकद ओळखू लागल्या आहेत. अर्थात चिंता करण्यासाठी गोष्ट अजून आहेच, ती म्हणजे ज्या प्रमाणात स्त्रिया लोकसभेत पोहचायला हव्यात, तेवढ्या प्रमाणात त्या पोहचत नाहीत. पण हळूहळू का होईना, हे अंतर कमी होत जाईल.

 

 

आता हे सांगायची गरज नाही की, समाजात महिला असतील तरच जग सुंदर होईल. आपल्या देशात मात्र मुलांच्या तुलनेत मुलींची कमी होत असलेली संख्या असंतुलन परिस्थिती निर्माण करत आहे. एक हजार पुरुषांच्या तुलनेत मुलींची संख्या इतकी कमी होऊ लागली आहे की, आणखी काही वर्षांनी मुलीच शिल्लक राहणार नाहीत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यामागचे कारण एकच सामाजिक संतुलन. शिक्षण,जागृती आणि सक्रियता या सगळ्या गोष्टींमुळे काहीसा फरक पडला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 940 इतकी होती.  तर  2001 मध्ये हेच प्रमाण 933 होते. यात काही अंशी सुधारणा झाली आहे. भारतातल्या काही राज्यांमध्ये अशीही परिस्थिती आहे,  जिथे 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या त्याहून अधिक आहे. पण ही काही स्पर्धा नाही. साधी गोष्ट आहे, महिलांचे प्रमाणदेखील पुरुषांच्या बरोबरीने पाहिजे. या लक्ष्याच्या दिशेने आपली पावले निश्‍चितच पडत आहे. फक्त त्याला वेग यायला हवा.

 

 

कुठल्या तरी शायरने म्हटले आहे, ‘डिबिया में है धूप टुकडा वक्त पडा तो खोलूंगी। आसमान जब घर आएगा मैं अपने पर तौलूंगी।’ पण आता असं वाटू लागलं आहे की, आजच्या महिला आकाश घरी येण्याची वाट पाहात नाहीत,तर त्या आपल्या वाट्याचे (हिश्श्याचे) आकाश शोधायला बाहेर पडल्या आहेत. एका बाजूला महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी घराबाहेर पडत आहेत, तर दुसर्‍या बाजूला आपले अधिकार आणि आपल्यासाठी बनवण्यात आलेल्या कायद्यांचीही माहिती मिळवाताना दिसत आहेत. तुम्ही निम्न मध्यमवर्गातील कुटुंबातील मुलींनाही पाहिले तर लक्षात येईल की, आता या मुली नोकरीसाठी घराबाहेर पडत आहेत. किंवा घरातूनच एकादे काम करताना दिसत आहेत. त्यांचे आर्थोर्जन कुटुंबासाठी सहाय्यभूत ठरत आहेच शिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यालाही हातभार लागत आहे. आर्थिक महत्त्व आता महिलांच्या लक्षात येत आहे.निर्भयाकांडनंतर ज्याप्रकारे महिलांनी आपली एकजूट दाखवली आणि दुष्कर्मसंबंधी कायद्यात सरकारला बदल करायला भाग पाडले, त्याप्रकारे महिलांच्या हिताच्या अनेक गोष्टी आता त्यांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. अशाच प्रकारे मी टू सारख्या अभियानामध्ये महिलांना एक नवी ताकद मिळाली. यामुळेच महिलांमध्ये धाडस वाढत चालले आहे. लहान लहान गावे, शहरे आणि महानगरे यांमधील स्त्रिया आपल्यासोबत होणार्‍या हिंसा आणि अत्याचार याच्या विरोधात आवाज उठवू लागल्या आहेत. या आवाजाला संघटीत स्वरुप प्राप्त होत आहे.

 

अजून याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत नसले तरी जसजशी जागरुकता, सक्रियता आणि धाडस वाढत जाईल, तसतसे चित्र आणखी स्पष्ट होईल आणि परिस्थिती सुधारेल.
जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे चित्र पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, आज पहिल्यापेक्षा अधिक मुली या तंत्रज्ञान शिक्षणावर जोर देताना दिसत आहेत. त्यांची संख्या याठिकाणी मोठी दिसत आहेत. पूर्वी हे क्षेत्र फक्त मुलांसाठीच असल्याचे मानले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आज मुलींची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याची अनुकूलता दिसून येत आहे. सामाजिक व्यवस्था आणि कौटुंबिक बंधन ती तोडायला सज्ज झाली आहे. 19 व्या शतकात डॉ. आनंदीबाई जोशी यांनी सुरू केलेला हा प्रवास 20 व्या शतकात जानकी अम्माल, कमला सोहोनी, अण्णा मणि, असिमा चटर्जी, राजेश्‍वरी चटर्जी, दर्शन रंगनाथन, मंगला नारळीकरसारख्या शास्त्रज्ञा यांच्यासह सध्या काळात यमुना कृष्णन, शोभा तोळे, प्रेरणा शर्मा, नीना गुप्तापर्यंत पोहचला आहे. ही नावं हेच सिद्ध करत आहेत की, गणित, विज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात जटील मीमांसा आणि सिद्धांत विकास प्रक्रियेमध्येदेखील महिला अप्रतिम असे योगदान देताना दिसत आहेत.

 

 

अर्थात हेही खरं आहे की, विज्ञानसंबंधी संस्थांमध्ये महिलांच्या उपस्थितीबाबत भारत अजून बराच मागे आहे. या दिशेने महिलांची भागिदारी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांमधील भेदभाव आणि पूर्वग्रह यांना तिलांजली द्यायला हवी.तरच आपल्याला महिला सशक्तीकरणाचे हे चित्र पाहायला मिळणार आहे. अजूनही काही क्षेत्रात महिलांचा सहभाग नसल्यात जमा आहे. पण महिला आपल्या अधिकारांविषयी जागृत झाल्या आहेत. त्या हाही रस्ता निवडतील, अशी आशा आणि विश्‍वास आहे.
या जगात संतुलनाला महत्त्व आहे. संतुलन असेल तर पृथ्वी आणि माणूस टिकणार आहे. पृथ्वीवर झाडे, वन्यजीव, जनजीव, पाणी, हवा या सर्वांचे मिळून एक संतुलन बनले आहे. हेच संतुलन पृथ्वी आणि माणसाचे आरोग्य ठीक करू शकते. यामुळेच पृथ्वीचे सौंदर्य टिकून आहे. मग अशाच प्रकारचे संतुलन मानवांमध्ये नको का? जरा कल्पना करा, ज्या घरात स्त्री नसेल, त्या घराची अवस्था कशी असेल? कुरुपताच तिथे दिसेल ना? वास्तविक घरात महिला असेल तरच घर सुंदर दिसतं. घर परिपूर्ण होतं.

 

आई, बहीण, मुलगी, पत्नी यांच्यामुळेच घराला वैभव प्राप्त होते. घर,कुटुंब, गाव, खेडे, शहर आणि देश-दुनियेतसुद्धा असे संतुलन आवश्यक आहे. तरच ही दुनिया सुंदर दिसणार आहे.

 

– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here