सेंद्रिय हळद- बेदाणा’ ही सांगलीची ओळख व्हावी

0
हळदीच्या निर्मितीपासून त्याचा स्वयंपाकातील वापर याविषयी माहितीपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर सांगलीला येऊन गेले. भारतातील खाद्यपदार्थ आणि मसाले या विषयांवर ते माहितीपट तयार करत आहेत. हळदीसाठी त्यांनी सांगलीची निवड केली. सांगली दौऱ्यात त्यांनी हळदीची शेती,त्यावरील प्रक्रिया, सौदे, हळद पावडर ,हरिपुरातील पेवे यावर अभ्यास आणि चित्रीकरण केले. मात्र त्यांना इथे काही गोष्टी खटकल्या. सांगली हळद आणि बेदाण्यासाठी फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशभर प्रसिध्द आहे.

 

पण तरीही इथे सेंद्रिय हळद आणि बेदाणा मिळत नाही. सांगलीचा जगात डंका वाजायचा असेल तर सेंद्रिय पिकांना आपलंसं करण्याचे आवाहन संजीव कपूर यांनी सांगलीकरांना केलं आहे. ग्राहक चकचकीत पदार्थांकडे आकर्षित होत असला तरी आता लोकांना त्यात पोषणमूल्यांची कमतरता आहे,याची कल्पना येऊ लागली आहे.लोक सेंद्रिय खाद्यपदार्थांकडे वळू लागला आहे. सांगलीने आपला ब्रँड बाजारात आणला पाहिजे. सेंद्रिय पिकांमुळे शेतकऱ्यांना जादा दर मिळून जाईल.  त्याची प्रसिद्धी केली पाहिजे. सांगलीकरांनी मनावर घेतले तर सांगलीची हळद-बेदाणासाठी ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे संगलीकरांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.

 

 

सांगलीची हळद ही नैसर्गिकदृष्ट्या दर्जेदार आणि गुणात्मक आहे,पण याची माहिती हळद घेणाऱ्या ग्राहकाला नाही. ही माहिती ग्राहकाला करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सांगलीतील व्यावसायिकांनी, शेतकऱ्यांनी आणि सामान्य सांगलीकरांनी आता हातपाय हलवले पाहिजेत.आत्ममग्न आणि आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. कोरोनाच्या काळात लोक प्रोटिन्सयुक्त खाण्याकडे वळले आहेत. हळद ही सर्वात चांगली प्रोटीन्सयुक्त घटक आहे.चवीसाठी हळद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र तरीही हळद मसाल्याच्या पदार्थांपेक्षा मागे आहे. सांगलीच्या हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ते औषधी कंपन्यांना माहिती करून देण्याची गरज आहे. औषधी कंपन्या हळदीसाठी मोठी बाजारपेठ असू शकते.

 

 

सांगलीच्या हळदीच्या व्यापाराला जवळपास दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे.1910 च्या सुमारास येथे हळद वायदे बाजार सुरू झाल्याची नोंद आढळते. हळदीच्या व्यापाराबरोबर हळदपूड व पॉलिशचे कारखानेही उभे राहिले.हळूहळू इथल्या बाजारात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह शेजारील कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथून हळद विक्रीसाठी येऊ लागली.हळदीचे सौदे प्रामाणिकपणे काढले जात असल्याने त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आजही सांगलीत शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पेढ्या आहेत. हळदीच्या दरातील पारदर्शकतेमुळे देशभरात इतर ठिकाणी सौदे होण्यापूर्वी सांगलीतला दर विचारला जातो.

 

केवळ देशातच नव्हे तर सातासमुद्रापार सांगली म्हणजे हळद अर्थात ‘टर्मरीक सिटी’ अशी ओळख निर्माण झाली. हळद साठवणारी हरिपुरातील नैसर्गिक पेवे म्हणजे आश्चर्यच आहे. दुर्दैवाने 2005 च्या महापुरानंतर या पेवांची मोठी पडझड झाली.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांत इथल्या बाजारपेठेतील आवक वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारपेठेतील हळदीची वार्षिक आवक 12 ते 13 लाख क्विंटल इतकी आहे. राजापुरी व परपेठ हळदीची उलाढाल जवळपास हजार कोटींपर्यंत आहे. हळदीमुळे इथे अनेकांना रोजगार मिळाला आहे. हळदीला दोन वर्षांपूर्वी ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हळदीला एकप्रकारे ‘क्वॅलिटी टॅग’ लागला.

 

संपूर्ण जिल्ह्यासाठी हळदीला मानांकन मिळवणारा सांगली हा देशातील एकमेव जिल्हा म्हणावा लागेल. हळदीला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधोरेखित झाली आहे, पण अजून यासाठी बरेच काम करावे लागणार आहे. शेफ संजीव कपूर भारतभर सर्वत्र फिरतात. अभ्यास करतात. साहजिकच त्यांना सांगलीच्या हळदीचे महत्त्व माहीत आहे, मात्र अजूनही हळद तिच्या महत्वाच्या तुलनेत मागे असल्याचे दिसून येते.

 

 

हीच परिस्थिती बेदाण्याची आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठे-महांकाळ, आटपाडी, विटा, पलूस, कडेगाव, जत या तालुक्यात 1972 च्या दुष्काळानंतर शेती व्यवसायात आमूलाग्र बदल होत गेले. ज्वारी, बाजरी येणाऱ्या मुरमाड जमिनीत द्राक्ष पिकांची मोठ्या प्रमाणात लागवण झाली. सिलेक्शन सारखी बियांची द्राक्षे बाजूला जावून इथल्या संशोधक शेतकऱ्यांनी बाजारपेठेला आवश्यक असणाऱ्या जातींचा जाणीवपूर्वक विकास केला. थॉमसन सिडलेस या जातीमध्ये सुधारणा करून सोनाका, तास-ए-गणेश या जाती विकसित केल्या.

 

काळीसाहेबी,चिमासाहेबीसारख्या जाती तर पारंपरिक होत्याच,
पण बाजारपेठेत कशा पद्धतीच्या द्राक्षांना मागणी आहे त्या पद्धतीने उत्पादन करण्याचा प्रयत्न जाणकार शेतकऱ्यांनी अवलंबला. यामध्ये तासगावच्या वसंतराव आर्वे यांचे नाव अग्रहक्काने घ्यावे लागेल. सांगली जिल्ह्यात सुमारे दीड लाखएकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जाते. आजच्या घडीला 1 एकर द्राक्ष पीक करायचे झाले तर येणारा खर्च 4 ते 5 लाख रुपये आहे. सहकारी सोसायट्या आणि राष्ट्रीयीकृत बँका बाग उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देत असल्यामुळे शेतकरीही मोठ्या प्रमाणात या शेतीकडे वळले.

 

बेदाणा निर्मितीप्रक्रिया अशी आहे: द्राक्षाची फळछाटणी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 150 दिवसांनंतर द्राक्षाचे मणी बेदाणा निर्मितीच्या स्थितीत येतात. या वेळी द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच शर्करेचे प्रमाण 22 असावे लागते. एकदा का हे प्रमाण निश्चित झाले की, बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते.बागेतील द्राक्षे काढणे, प्लास्टिकच्या  कॅरेटमध्ये द्राक्षांचे घड ठेवून ते पोटॅशियम कार्बोनेट  आणि डपिंग ऑइल मध्ये बुडविणे ही कामे बागेतच पार पाडली जातात. पुन्हा हा माल वाहनाने शेडवर नेला जातो. शेडवर उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगलवरील जाळीवर पसरण्याचे काम 8 तासांत करावे लागते. त्यानंतर तिसऱ्या व पाचव्या दिवशी जाळीवर पसरलेल्या द्राक्षांवर पुन्हा पोटॅशियम कार्बोनेट आणि डपिंग ऑइलचा पंपाने फवारा द्यावा लागतो. हवेत उष्णता असेल तर, 12 ते 15 दिवसांत हा माल वाळतो. द्राक्ष मण्यातील पाणी  सुकल्यामुळे बेदाणे तयार होतात.

 

या बेदाण्यात मोठ्या प्रमाणात काडी-कचरा राहिलेला असतो. तो बाजूला करण्यासाठी पुन्हा यंत्राचा वापर करून मळणी करून घ्यावी लागते. ही मळणी झाल्यानंतर मनुष्यबळाने प्रतवारी निश्चित करावी लागते. प्रतवारी झाल्यानंतर पुन्हा एकदा बेदाणे यंत्रामध्ये धुवून सुकवावे लागतात. सुकविल्यानंतर हा बेदाणा विक्रीसाठी खोक्यामध्ये बंदिस्त केला जातो. विक्री योग्य बेदाण्याचे बॉक्स हवामानाच्या बदलामुळे खराब होऊ नयेत अथवा प्रतवारी कमी होऊ नये यासाठी तत्काळ शीतगृहात ठेवले जातात. अशी एकंदर बेदाणा निर्मितीची प्रक्रिया राबविली जाते.

 

करोना संकटानंतर अंगभूत प्रतिकारक्षमता वाढीसाठी बेदाणा उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात असल्याने देशांतर्गत बाजारातही मागणी वाढली आहे.याचा निश्चितच फायदा उत्पादकांना मिळणार आहे. द्राक्षाच्या एका वेलीपासून 20 ते 30 किलो द्राक्ष उत्पादन अपेक्षित असते. यापासून एक ते दीड किलो बेदाणा तयार होतो. यापेक्षा जास्त उत्पादन जर घेतले तर बेदाण्याची प्रतवारी खराब होते. त्यामुळे
जास्तीची घडाची संख्या कमी करावी लागते.
द्राक्षवेलीसाठी प्रारंभी जूरुट पद्धत अवलंबिली जात होती. मात्र, आता जंगली वेल लावून चार-पाच
महिन्यांनंतर याच जंगली वेलीवर आपणास हव्या त्या जातीचा डोळा भरण्यात येतो.
या कलमामुळे द्राक्ष उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढली आहेच. दुसऱ्या बाजूला कमी पाण्यावर जंगली वेल तग धरत असल्याने उपलब्ध पाण्यावर जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. या बेदाण्याच्या निमित्ताने जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल दर वर्षी होत असते. द्राक्ष लावणीपासून छाटणी, औषध फवारणी, काढणी, बेदाणा निर्मिती ही कामे मजूर वर्गांकडूनच केली जातात. त्यामुळे शेत मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी द्राक्ष शेतीत उपलब्ध झाली आहे.
याशिवाय वाहतुकीसाठी टेम्पो-ट्रकचा वापर होत
असल्याने तोही व्यवसाय या बेदाणा निर्मितीला पोषक ठरला आहे. आता सांगलीकरांनी शेफ संजीव कपूर यांच्या म्हणण्याकडेही लक्ष द्यावे लागेल.तरच खऱ्या अर्थाने हळद-बेदाण्याची सांगली म्हणून ओळख होईल.

 

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.