अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल ; जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0
Rate Card
मुंबई : कृषी, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांवर भर देणारा राज्याचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा सन २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींचे श्री. जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.

श्री. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद अतिशय महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात येत्या वर्षभरात १०४ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी सुमारे ८४० कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद विदर्भाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

कोयना, जायकवाडी आणि गोसीखुर्द धरणाच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या भागातील रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सोळा जिल्ह्यात शंभर खाटांचे महिला रुग्णालये उभारण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली तरतूद गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारणीसाठी पाचशे कोटी आणि स्टार्ट अप फंडसाठी शंभर कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद अतिशय स्वागतार्ह असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

पर्यटनाच्या विकासासाठी नवीन प्रकल्पांची सुरूवात करण्याचा संकल्प महत्वाचा आहे. पुणे वन विभागातील बिबट्या सफारी आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा उद्यानातील अफ्रिकन सफारी सुरू करण्याचा मानस चांगला आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

कृषीसाठी करण्यात आलेली तरतूद शेती आणि संलग्न क्षेत्राला चालना देणारी ठरेल. येत्या वर्षभरात साठ हजार वीज पंपांना जोडण्या देण्याचे करण्यात आलेले नियोजन शाश्वत सिंचनासाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल. ग्राम विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी अर्थ संकल्पात करण्यात आलेली तरतूद निश्चितच चांगली आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

दळणवळणाच्या सुविधा विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, मेट्रो विकासासाठी करण्यात आलेली  तरतूद राज्यातील प्रगतीला चालना देईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.