बारामती : राज्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग पाहता याबाबत कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी अल्पवयीन मुलांचे वय १८ वरून १४ करण्याबाबत कायदा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की चौदा वर्षांच्या पुढील प्रत्येक युवकाचा गुन्ह्यातील सहभाग कडक कारवाईसाठी पात्र ठरावा, हे अधिकाऱ्यांचेदेखील म्हणणे आहे. कायद्यात बदल करण्याचा विषय केंद्र सरकारशी निगडित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घालून आम्ही केंद्र सरकारला याबाबतचा प्रस्ताव देणार आहोत.

…म्हणून लाडकी बहीण योजना आणली भांड्याला भांडं लागतं, घराघरात हे घडतं. जावाजावांच्यात किती पटतं मला माहिती आहे. अलीकडे चुलत्या-पुतण्यात आणि बहीण-भाऊ यांच्यात किती पटतं, याचीही मला माहिती आहे. त्यामुळेच मी लाडकी बहीण योजना आणली व सगळ्याच बहिणींना खुश केले, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी येथे आयोजित बूथ कमिटी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली.