सुख-दु:खाचा फेरा…

0
2
मानवी जीवन सुख-दु:खाने भरलेलं आहे. कधी सुख तर कधी दु:ख ठरलेलं आहे. सुखासीन फुलांच्या पाकळ्यांवर लोळताना दु:खाचे काटे बोचणारच. सुख-दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डाव घेताना छापा-काटा करायची वेळ येते,तेव्हा आपला मर्जीचा छापा यावा,म्हणून आपण देवाला हात जोडत असतो. छापा आला की, आपण अक्षरश: आनंदाने उड्या मारतो. तो आनंद स्वर्गीय असतो. पण सतत सुखाची अपेक्षा करणं चांगलं असलं तरी वाट्याला दु:ख आलं म्हणून हिरमसून जायचं नाही. त्याला हसत तोंड द्यायचं. हसत तोड देतो, तेव्हा दु:ख हलकं होतं. जर एकादी व्यक्ती दु:खाला तोंड द्यायला घाबरते, रडू लागते,तेव्ह अडचणींचा, समस्यांचा डोंगर वाढायला लागतो.पण ज्यावेळेला व्यक्ती दु:खाला पाहून हसते,तेव्हा अडचणी नाहीशा होतात.

 

अडचणी हलक्या होतात.फ्लेडंस निवासी गोल्डस्मिथने एक अशी व्यक्ती शोधून काढली होती की, तशी व्यक्ती त्याने त्यांच्या आयुष्यात कधी पहिली नव्हती. तो एक गुलाम होता. साखळदंडांनी बांधलेला होता.त्याच्या नशिबीच ते होतं. पण थकवा म्हणून त्याच्या चेहर्‍यावर कधी नव्हता.तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुणगुणतच असायचा. सगळे दु:ख गिळून टाकत जीवन हसत कसं जगावं, हेच तो सांगत होता. उदासी वाट्याला आलेलं जीवन त्याला कशाप्रकारचं आनंदाचे रंग द्यायचे,ही कला आपल्याला साधली पाहिजे.जीवन जर फूल असेल तर काटेदेखील त्याच्याबरोबरच येणारच. त्यामुळे सुख-दु:ख यांचं नातं आपल्या संपूर्ण जीवनाशी बांधलं गेलं आहे. जीवनात मेहनतीला जसं महत्त्व आहे, तसंच फुलांबरोबरच काट्यांचंही आहे. सुख-दु:ख जीवनचा अविभाज्य भाग आहे.

 

त्यामुळे प्रत्येकाला त्या प्रसन्नचित्त गुलामासारखं जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीचे हसून स्वागत केले पाहिजे. जर व्यक्ती सुख आनंदाने भोगत असेल तर मग दु:खदेखील हसत हसत का नाही भोगू शकत?मानवी जीवनात संकटाच्या घटना या आवश्य येत राहतात.वेद सांगतो की, ज्यावेळेला समस्यांचे ओझे डोक्यावर  असते आणि दु:खाच्या रेषा मनाला त्रास देत असतील आणि चोहो बाजूला अंधार असेल तरीदेखील संतुलन बिघडू न देता, स्वत:ला कमी न लेखता,हसत-गात जीवनाची गाडी हाकत राहायचं. दु:खाचं ठिकाण आपोआपच मागे जातं.आयुष्यात जी माणसं मोठी झाली,त्या माणसांनी खूप सोसलेलं असतं. देवपण असं सहजासहजी कुणाला मिळत नाही. दगडातून सुंदर मूर्तीची निर्मिती होते,तेव्हा त्याला घाव सोसावे लागलेले असतात.त्यामुळे जीवनातल्या भट्टीत जी माणसं तावून-सुलाखून निघतात, तेव्हाच ती उच्च पातळीला पोहचलेली असतात. अशी माणसं आपण पाहिली आहेत,तर मग आपण बारीक-सारीक दु:खाकडे पाहून गोंधळून जायचा प्रश्‍नच येत नाही. घाबरून तर अजिबात जायचं नाही.

 

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here