अहिल्यादेवींची अवहेलना झाल्यास २७ मार्चला आत्मदहन ; धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांचा इशारा
सांगली,संकेत टाइम्स : जेजुरी (जि. पुणे) येथील अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमापुर्वी हुल्लडबाजी करताना अहिल्यादेवींची अवहेलना केली होती. त्याची पुनरावृत्ती सांगलीत घडल्यास २७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या स्मारकाचे उदघाटन हे शांतता आणि आनंदी वातावरणात व्हायला हवे, मात्र तिथे दंगलसदृश्य परिस्थिती तयार केली जात आहे.हे चुकीचे आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. ढोणे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अहिल्यादेवींचे स्मारक हे राजकारणाचा अड्डा केला जात असून तिथे जेजुरीच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा डाव असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महापालिका आणि पोलिस प्रशासनाशी बोलून योग्य निर्णय घ्यावेत, असे म्हटले आहे.
