रोगापेक्षा रूग्णअवस्थेवर लक्ष केंद्रित केल्यास वैद्यकिय सेवा घडेल 

0
सांगली : सामाजिक क्षेत्रात आरोग्य विषयक काम करताना सामाजिक जाणीव, बांधिलकी, प्रामाणिकपणा, समन्वय आणि सकारत्मकता ठेवून सातत्याने काम केल्यास यश निश्चितच मिळते आणि त्यामुळे आरोग्य सेवाही चांगली घडते. रोगापेक्षा रूग्णअवस्थेवर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने वैद्यकिय सेवा घडेल, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी केले.
 24 मार्च, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हॉटेल कॅपिटल किचन सांगली येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 

 

 राज्यामध्ये अनेक ठिकाणी वैद्यकिय सेवा करण्याचा योग आला पण सांगली जिल्ह्यात वैद्यकिय सेवा करण्यामध्ये अधिक आनंद आला. सांगली जिल्हा वैद्यकिय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहील असे सांगून अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले,  क्षयरोग  हा उपचाराने हमखास बरा होतो पण 1852 मध्ये जर्मन चिकित्सक रॉबर्ट कोच यांनी टी.बी. चा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस या जीवाणूचा शोध लावला.

 

त्यांचा हा शोध मानवजातीवर फार मोठे उपकार आहेत. क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी देशपातळीवरही मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सन 2025 पर्यंत क्षयरोग देशातून समूळ नष्ट  करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील रूग्णसेवा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
 अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना कुपेकर म्हणाल्या, क्षयरोग संपविण्यासाठी ज्यांना लक्षणे जाणवत असतील त्यांनी तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

 

तसेच क्षयरोग शोध मोहिम प्रभावीपणे राबवून क्षयमुक्त जिल्हा करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनही संपूर्ण मदत केली जाईल. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी आपण सर्वजण मिळून अधिक जोमाने काम करू असे त्या म्हणाल्या.
 जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम तीन महिन्यात जवळपास 80 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. तर जिल्ह्यात क्षयरोग बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के इतके आहे.

 

Rate Card
क्षयरोग तपास मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात 24 मार्च ते 13 एप्रिल पर्यंत तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये क्षयरोग जनजागृतीसाठी 330 समुदाय अधिकारी कार्यरत आहेत. ज्यांच्या घरात टी.बी. रूग्ण आढळतील त्या घरातील सर्वच व्यक्तींना औषधोपचार केले जातात.

 

सांगली जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये Drug Sensitive TB (औषधाना दाद देणारा) शासकीय आरोग्य संस्थेमध्ये  1 हजार 505 क्षयरूग्ण आणि खाजगी आरोग्य संस्थेमध्ये 1 हजार 6 क्षयरूग्ण नोंदणी झाले आहेत तर Drug Registance TB (औषधाना दाद न देणारा) 124 इतके क्षयरूग्ण नोंदणी झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी डॉ. शिशीर मिरगुंडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  तसेच उपस्थितांनी क्षयरोग नियंत्रण प्रतिज्ञा घेतली.

 

या कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट काम केल्याबद्दल क्षयरोग पथक विटा चे डॉ. अनिल लोखंडे, ग्रामीण रूग्णालय विटा वैद्यकिय अधिक्षक डॉ. विशाल ठोंबरे,  तासगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव व शिराळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चरण व कोकरूड, शरद कुंभार, महादेव हडपद, विनायक जोशी, श्री. जयंत, खाजगी वैद्यकिय व्यवसायिक डॉ. पी. ए. पवार, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. तर रांगोळी स्पर्धेत अनिता फाळके, अमरज्योती, अस्मिता काशीद, ऋतिका जाधव, निबंध स्पर्धेत समर्थ साळुंखे, कोमल पाटील, पोस्टर स्पर्धेत मनिषा कारंडे, विद्या, प्रतिक्षा तटपुजे, पुजा चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पी. एन. काळे व सतिश सवदे यांनी केले. आभार  वैद्यकिय अधिक्षक डॉ. संतोष राचोटकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.