सहकारी संस्थांची चौथ्या ते सहाव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया 1 एप्रिलपासून

0
पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यातील तसेच 2021 मधील 31 मार्च 2021 पर्यंत मुदत संपलेल्या एकूण 17 हजार 194 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस 1 एप्रिल 2022 पासून सुरुवात होणार आहे.
शासनाने कोव्हिड- 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया वेळोवेळी आदेश पारीत करून पुढे ढकललेल्या होत्या. परंतु, सद्यस्थितीत निवडणूक स्थगित करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2021 रोजी समाप्त झालेला आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिनांक 31 डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र 45 हजार 409 सहकारी संस्थांचा 6 टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला  आहे. तसेच ई-1 सन 2021 व ई-1 सन 2022 मध्ये अनुक्रमे 19 हजार 755 आणि 13 हजार 32 सहकारी संस्था निवडणूकीस पात्र आहेत.
प्राधिकरणाने ‘जिल्हा निवडणूक आराखडयातील’ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 3 हजार 905 व 13 हजार 98 अशा एकूण 17 हजार 3 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केलेल्या आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यातील इतर 9 हजार 99 व उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार 31 मार्च 2022 पर्यंत निवडणूकीस पात्र  15 हजार 320 प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था अशा एकूण 24 हजार 419 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केलेल्या असून अशा एकूण 41 हजार 422 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या आहेत.
पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 3 हजार 767, 6 हजार 391 व 12 हजार 898 अशा एकूण 23 हजार 56 सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्राप्त झालेल्या आहेत अशा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्राप्त झालेल्या नाहीत अशा सहकारी संस्थांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत संस्थेच्या निबंधकांना आदेश देण्यात आले आहेत.
चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यातील व ई-1 सन 2021 मधील 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीतील अनुक्रमे 4 हजार 571, 3 हजार 376, 4 हजार 834 आणि 4 हजार 413 अशा एकूण 17 हजार 194 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 1 एप्रिल 2022 पासून सुरु करण्याचे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अ वर्गातील 89 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असून प्रामुख्याने 30 सहकारी साखर कारखाने व 45 सूतगिरण्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहेत.
राज्यात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत असून त्यापैकी 21 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या आहेत. शासनाने आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन नाशिक, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. तर रायगड व जालना या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सन 2022 या ई-1 वर्षात निवडणुकीस पात्र असून प्राधिकरणाने अद्याप सदर बँकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केलेल्या नाही. गोंदीया, भंडारा, आणि चंद्रपूर या 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायप्रविष्ट आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत.
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश पारीत करून राज्यातील निवडणूकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूका प्रथमत: तातडीने मुदतीत पूर्ण कराव्यात व त्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 65२, 1 हजार 611 व 15 हजार 320 अशा एकूण 17 हजार 583 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या असून त्यापैकी अनुक्रमे 652, 972 व 11 हजार 747 अशा एकूण 13 हजार 371 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
प्रारूप मतदार याद्या प्राप्त झालेल्या आहेत अशा उर्वरित कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच प्रारूप मतदार याद्या प्राप्त न झालेल्या संस्थांवर प्रशासकीय कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूका पूर्ण झाल्यानंतर आगामी काळात 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका पूर्ण करण्यात येणार आहेत.
या संस्थांच्या निवडणूका घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी कळविले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.