Post Views : 69 views
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर दिवाळीला नोव्हेंबर 2021 मध्ये पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ लागले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. संपूर्ण बंदीमुळे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी रखडले असल्याने दिवाळीला चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर सर्वच निर्माते-दिग्दर्शकांनी आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तयारी सुरू केली.
दिवाळीनंतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची उपस्थितीही चांगली दिसू लागली. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारनेही आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, केवळ माझेच नव्हे तर प्रत्येकाचे चित्रपट हिट व्हावेत, जेणेकरून चित्रपटसृष्टीमध्ये अधिकाधिक पैशांचा ओघ वाढवा. अक्षय कुमारचे म्हणणेही कुठेतरी खरे असल्याचे दिसून आले, कारण पूर्णबंदीनंतर प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अशा प्रकारची कमाई केली, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘आरआरआर’ चित्रपट असो किंवा डब केलेला ‘पुष्पा’ चित्रपट असो किंवा काश्मिरी पंडितांवर बनवलेला ‘काश्मीर फाइल्स’ असो या सगळ्यांनी नजर लागण्यासारखा बिझनेस केला आहे.
2022 मध्ये असे अनेक चित्रपट आले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. यासोबतच यावेळच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन एकदिवसीय क्रिकेट सामन्याची आठवण करून देणारे आहे. शेवटच्या षटकात काय होईल हे कोणालाच माहीत नाही. त्याच प्रकारे 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कमाईमध्ये असे चढ-उतार पाहायला मिळाले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. यामध्ये, अल्लू अर्जुन स्टारर डब केलेल्या ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली, तर ‘काश्मीर फाइल्स’नेही बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक व्यवसाय केला.
दिवाळीला रिलीज झालेल्या अक्षय कुमार, अजय देवगण आणि कतरिना कैफ स्टारर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने मात्र जगभरात 294 कोटी रुपयांचा व्यवसाय करून धडाक्यात सुरुवात करून दिली. त्याच वेळी मात्र राणी मुखर्जी आणि सैफ अली खान स्टारर ‘बंटी बबली 2’ चे कलेक्शन 22.01 कोटी इतके राहिले. जॉन अब्राहम अभिनीत ‘सत्यमेव जयते 2’ ने 17.29 कोटी, सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर ‘लास्ट द ट्रुथ’ने 58.37 कोटी, अक्षय कुमार स्टारर ‘बेलबाटम’ने 50 कोटी, आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर स्टारर ‘चंदीगड करे आशिकी’ 35 कोटी, सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी याच्या ‘तड़प’ ने 34.86 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. ‘ तड़प’ चित्रपटाची कमाई फारशी झाली नसली तरी या चित्रपटाने खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन अभिनीत आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटानेही खर्चापेक्षा जास्त कमाई केली. ‘झुंड’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 30 कोटी रुपये होते. ‘बधाई दो’चे दोन आठवड्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जगभरात 15.50 आणि 28 कोटी इतके आहे.
प्रभास अभिनीत ‘राधेश्याम’ने दोन आठवड्यांत 15.50 कोटी रुपये आणि जगभरात 154 कोटी रुपये कमावले.’काश्मीर फाइल्स’चे वर्ल्ड वाइड कलेक्शन 303 कोटी, ‘आरआरआर’चे 500 कोटी, अक्षय कुमार अभिनीत चित्रपट ‘बच्चन पांडे’ने दोन आठवड्यांतील 52 कोटी आणि वर्ल्ड वाईड 75 कोटी, संजय लीला भन्साळीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चे वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन 218 कोटी रुपये होते. अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटाने जगभरात 326 कोटींची कमाई केली. या चित्रपटांशिवाय आगामी काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. केजीएफ-2, आमिर खान स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’, प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’, अक्षय कुमार स्टारर ‘पृथ्वीराज चौहान’ इत्यादी. या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतरही चित्रपट उद्योगाला खूप फायदा होण्याची शक्यता आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आता मार्गाला लागली,असे म्हणायला हरकत नाही.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
