छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणप्रेरणेतून विद्यार्थ्यांनी उन्नती साधावी ; राज्यपाल 

0
Post Views : 270 views
कोल्हापूर :  छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र प्रचंड प्रेरणादायी आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजचे आपले अस्तित्व आहे, याचे भान राखून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्मरण करावे आणि त्यांच्या प्रेरणेतून स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभात घोषित करण्यात आलेली मा. राष्ट्रपती व मा. कुलपती यांची सुवर्णपदके तसेच शहीद तुकाराम ओंबाळे विशेष पारितोषिक प्रदान समारंभ आज कुलपती श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सव आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असा योग जुळून आला आहे, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक दायित्वही निष्ठेने जपले आहे. कोविडच्या कालखंडात विद्यापीठ परिवाराने, विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.
कोविडच्या काळात शैक्षणिक बाबतीत पडलेला खंड आता विद्यार्थी-शिक्षकांनी दुप्पट मेहनतीने भरून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन करून श्री. कोश्यारी म्हणाले, सध्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दिसण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे विविध अॅप्स पाहिले की सहज निदर्शनास येत आहे. तथापि, केवळ दिसण्यापेक्षा आपण अनेकविध चांगल्या गोष्टी करण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत करून कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी मिळून एकदिलाने प्रगतीपथावर वाटचाल केली पाहिजे. त्यातून आपल्या प्रदेशाचे, देशाचे नाव उंचावण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.