मुंबई : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.