कोविडचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीचा दुसरा व प्रिकॉशन डोस घ्या – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  

0
Post Views : 65 views

 

– 12 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना लसीचा दुसरा डोस सत्वर द्या

– 18 वर्षावरील पात्र सर्व नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस, प्रिकॉशन डोस घ्यावा

 

        सांगली : देशात व राज्यात ठिकठिकाणी  कोविड-19 चे रूग्ण पुन्हा नव्याने आढळत असून वेळीच अटकाव घालण्यासाठी सर्वांनी कोविड-19 योग्य वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे.  कोविड-19 चा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी  12 ते 14 वर्षे व 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना त्यांच्या पालकांनी सत्वर दुसरा डोस द्यावा. तसेच 18 वर्षावरील पात्र सर्व नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस, प्रिकॉशन डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

        जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Rate Card

        जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहिमेमध्ये लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद ‍दिल्यामुळे राज्यात 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणामध्ये सांगली जिल्हा  पहिल्या क्रमांकावर असून 15 ते 18 वर्षे वयोगटामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटातील शालेय व शालाबाह्य 93 हजार 477 बालकांपैकी 78 हजार 458 बालकांनी पहिला तर 38 हजार 972 बालकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील शालेय व शालाबाह्य 1 लाख 44 हजार 617 बालकांपैकी 1 लाख 43 हजार 129 बालकांनी पहिला तर 1 लाख 21 हजार 72 बालकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. 18 वर्षे वयोगटावरील 21 लाख 80 हजार नागरिकांपैकी 21 लाख 1 हजार 558 नागरिकांनी पहिला तर 18 लाख 95 हजार 27 नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.  57 हजार 989 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.  सांगली जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण जलदगतीने होण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या 90 गावांची निवड करून या गावांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या अंतर्गत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये या गावांमध्ये 100 टक्के लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास   जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम यांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये अद्यापही ज्या मुला-मुलींनी जंतनाशक गोळ्या घेतल्या नाहीत त्यांनी 29 एप्रिल रोजी जवळच्या आरोग्य संस्थेत व आशा, स्वयंसेविका यांच्या मार्फत जंतनाशक गोळ्या घ्यावात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. जिल्ह्यात 59 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येते. गरोदर मातांना दर्जेदार सेवा निशुल्क उपलब्ध  करून दिल्या जातात त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

सुरक्षित मातृत्व आश्वासीत कार्यक्रमांमध्ये सर्व गरोदर माता, सहा महिन्यापर्यंतच्या स्तनदा माता व आजारी बालके यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम सन 2021-22 मध्ये प्रायोगीक तत्वावर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कवठेपिरान तसेच उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी सुरू असून सन 2022-23 मध्ये 7 प्राथमिक आरोग्य केंद्र व 6 ग्रामीण रूग्णालये येथे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.