बारामती : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना गेल्या महिन्यात बारामतीत आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनगर समाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. त्या कार्यक्रमात एसटी आरक्षणाबाबत भरभरून आश्वासने देण्यात आली. त्यानंतरच्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत गेला असल्याने एसटी आरक्षण प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी स्थानिक कुरूबा (धनगर) समाजाच्या एसटी समावेशासाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली, तशी प्रक्रिया महाराष्ट्रातही घडवून आणावी, असे आवाहन धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर धनगर विवेक जाग्रती अभियानाच्या वतीने जवाब दो धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोणे यांनी ही भुमिका मांडली.एसटी आरक्षणप्रश्नी बारामती येथे जुलै २०१४ मध्ये ऐतिहासिक आंदोलन झाले.या आंदोलनासाठी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे २९ जुलै रोजी बारामतीत आले होते. भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करू, असे आश्वासन फडवणीस यांनी दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून धनगर बांधवांनी एकतर्फी मतदान भाजपला केले व भाजपला सत्ता मिळाली, तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय होऊ शकला नाही.धनगर एसटी आरक्षण प्रश्नी राज्य शासनाने केलेल्या सकारात्मक कार्यवाहीबाबतचे उत्तर आम्हाला हवे आहे, असे ढोणे म्हणाले.
सातत्याने समाजाला संभ्रमित केले जात आहे. गेल्याच महिन्यात बारामती येथे अजितदादा समर्थक कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी जयंतीचा सोहळा घेतला. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि धनगर नेते सिद्धरमय्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने धनगर समाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. बहुतेक सर्व नेत्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे शक्य असल्याचे सांगितले. २०१४ सालीच शरद पवार हे आरक्षण देणार होते, असेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात आणि कर्नाटकात महत्वपुर्ण घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत तर कर्नाटकातील कुरूबा- धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी सिद्धरमय्या सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस पाठवली आहे. कर्नाटकातील शिफारस हा देशभरातील धनगर समाजासाठी आनंदाचा विषय आहे.
त्यादृष्टीकोनातून महाराष्ट्रातील प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा आहे.धनगर समाजाचा प्रश्न सोडविण्याचे धैर्य दाखवावे, असे आवाहन ढोणे यांनी केले.आंदोलनाच्या निमित्ताने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्री. करे यांना देण्यात आले. आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, तसेच मंत्री समिती स्थापून राज्य आणि केंद्र सराकरमध्ये समन्वय करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी प्रवीण गडदे, बाळू मासाळ,अशोक गोरड, पोपट धवडे, चंद्रकांत वाघमोडे,तुकाराम कित्तूरे, तानाजी कटरे,युवराज हाके, काशिराम पडोळे, नंदकुमार पांढरे,अक्षय कोळेकर, बबन पडोळे, बबन खांडेकर, भरमाना खांडेकर, संजय पडोळे रफिक मंगळवेढे हे युवक आंदोलनात सहभागी झाले होते.