कवठेमहांकाळ : विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. बनाप्पा बाळासाहेब म्हार्नुर (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.
बनाप्पा म्हार्नुर हा गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यानंतर त्याला काही नागरिकांनी सकाळी अकरा वाजता त्या हॉटेलच्या पाठीमागे बंद पडलेल्या मिलजवळ पाहिले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बनाप्पा हा त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून मारेकऱ्यांनी तोंडाचा चेंदामेंदा केला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ एक गुलाबाचे फूलही आढळून आले आहे.
बनाप्पाचा खून हा गॅंगवार किंवा पूर्ववैमनस्यातून केला असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मारेकऱ्यांनी प्लॅन करून बनाप्पाचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पाच दिवसात तीसरा खून
नजरेला नजर मिळवणे आणि कोणाला मोठ्या आवाजात बोलले तरीही आता थेट त्याचा ‘गेम’ केला जात आहे. खून, खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला आहे.