एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
Post Views : 5 views

 

राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा संपन्न

 

 

पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे.

एसटीचा गौरशाली इतिहास जनतेपर्यंत न्यावा
कोरोना काळात अनेक जोखिमा असताना एसटी कर्मचाऱ्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे. एसटीमुळे आपले जीवन सुखकर झाले असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटीची ही वाटचाल चित्रफीतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बदलत्या काळानुसार नव्या संकल्पनांचा स्वीकार
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत सुधारणा करताना नव्या संकल्पना शासन स्वीकारत आहे. सर्वात जास्त विद्युत बस आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. विद्युत बसचे तंत्रज्ञान नवीन आहे, त्याची सवय व्हायला वेळ लागेल. एसटीची सेवा प्रदूषण विरहीत कशी होईल याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. काळाच्या गरजा आणि तंत्रज्ञानात होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रगती करणे हे आपले उद्दीष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. एसटी बसला पुण्यातून सुरूवात झाली आणि पुण्यातच अमृत महोत्सवाला सुरूवात होत आहे, हा योगायोग असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे नेऊया
मुख्यमंत्री म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांकडे आपल्या परिवारातले सदस्य म्हणून शासन पहात आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेवा देताना तोटा सहन करावाच लागतो. हे लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुढील काही वर्षांची हमी शासनाने घेतली आहे. यापुढेदेखील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शक्य असलेली सर्व मदत करण्यात येईल. आपण एका मोठ्या वैभवाचे भाग आहोत याची जाणीवही कर्मचाऱ्यांनी ठेवावी. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे, त्यातील प्रत्येक सदस्याला आनंदात आणि समाधान ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. राज्याच्या प्रगतीचे एसटी कर्मचारी अविभाज्य घटक आहेत. आपण घेतलेले जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे सुरू ठेऊया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Rate Card

एसटीला गतवैभव मिळवून देणारच- परिवहनमंत्री अनिल परब
एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

एसटीचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोरोनाच्या काळात एसटीने आगळेवेगळे काम केले आहे. टाळेबंदीमध्ये साडेसात लाख कामगारांना पराराज्याच्या सीमेवर जाण्यासाठी मोलाचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले. कोरोनानंतर एसटी पूर्वपदावर येत आहे. एसटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी मालवाहतूकीकडेही अधिक लक्ष देण्यात येत आहे. एसटी बदलांना सामोरे जात असून आज पहिली एसटी इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ बस सुरू केली आहे. कोरोना संकटाचा काळ विसरून एसटीच्या वैभवासाठी नव्या दमाने सुरूवात करण्याचे आवाहन ॲड.परब यांनी केले. प्रवाश्यांची सेवा, कर्मचाऱ्यांची काळजी आणि आणि आपल्या व्यवसायिक कर्तव्यावर प्रेम अशा त्रिसूत्री नुसार काम करूया, असेही ते म्हणाले.

* सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्वपूर्ण कार्य-डॉ.नीलम गोऱ्हे*
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्वपूर्ण करत एसटीने केले आहे. बदलत्या काळानुरुप एसटीने आपले पाऊले उचलली आहेत. आराम ते निमआराम तसेच आज नव्याने सुरू झालेली ‘शिवाई’ बस सेवा त्याचेच द्योतक आहे. राज्यभर या सेवेचा विस्तार लवकरच होत आहे ही आनंदाची बाब आहे. एसटी महामंडळाच्या मनुष्यबळ विकास तसेच विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी आपल्या सोबत आहे, असा विश्वास देत अपघात विरहित सेवेबद्दल त्यांनी वाहनचालकांचे कौतुक केले.

प्रास्ताविकात श्री. चन्ने म्हणाले, महाराष्ट्राच्या अनेक जडणघडणीत लालपरीचा महत्वाचा वाटा. राज्यात व ३६ बसपासून सुरू झलेला एसटीचा प्रवास २५० पेक्षा जास्त आगर आणि १७ हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे. कोरोना कालावधीतही एसटीने बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या गावी पोहोचविण्याची महत्वाची कामगिरी केली. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असताना अनेकांना वाहतूकीची सेवा देण्याचे कार्य एसटीने केले. महामंडळाने व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक सेवा सुरू केली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ‘महाकार्गो’ ब्रॅण्ड विकसीत केला आहे. भविष्यात तांत्रिकदृष्टया सक्षम बस सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या अमृत महोत्सवी गौरवशाली कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा दिलेल्या ३० चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी ॲड. परब याना ‘विठाई’ आणि गोऱ्हे यांना ‘शिवशाही’ गाडीची प्रतिकृती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.