पीडित पुरुषांनाही संरक्षण मिळावे !

0
2
वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आपल्या नवऱ्याच्या दिर्घआयुष्याची प्रार्थना करून हाच नवरा सात जन्म लाभो अशी मागणी करतात  हे आपल्याला माहीतच आहे पण औरंगाबादेतील वाळूंज भागातील पत्नीपढीत पुरुषांच्या आश्रमात  काही पत्नीपढीत पुरुषांनी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळपूजन करून पिंपळपौर्णिमा साजरी केली. हे पुरुष दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी करतात. आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की आम्ही त्यांच्यासोबत सात जन्मच काय  सात सेकंदही संसार करू शकत नाही म्हणूनच आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव अशी प्रार्थना ते यम आणि मुंजाला करतात.  हा प्रकार काहीसा विचित्र वाटत असला तरी खरा आहे.

 

कौटुंबिक हिंसाचारात महिलांवरच अन्याय अत्याचार होतो. महिलाच हिंसेचा बळी ठरतात हे आपल्याला माहीत आहे पण पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरतात यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही याला कारण आहे आपली पुरुष प्रधान संस्कृती. पुरुषच महिलांवर अत्याचार करतो, त्यांचा मानसिक छळ करतो हेच आजवर आपण पाहत आलो आहोत पण आता काळ बदलला आहे. पुरुषही महिलांच्या अत्याचाराला बळी पडत आहे.

 

आज कितीतरी पुरुष महिलांचा मानसिक अत्याचार सहन करत आहे. पत्नी आपल्यावर अत्याचार करते आपला मानसिक छळ करते हे जर समाजात माहीत झाले तर आपलीच नाचक्की होईल या भीतीने अनेक पुरुष तो अत्याचार मुकाट्याने सहन करतात. ज्यांना हा अत्याचार सहन होत नाही ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. कायदाही महिलांच्याच बाजूने आहे. पत्नीने पती विरुद्ध तक्रार दिली तर त्याची दखल घेतली जाते. पत्नीवर अन्याय करणाऱ्या पतीला तात्काळ अटक केली जाते पण पतीला पत्नी विरुद्ध कारवाई करायची असेल, तर आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार अधिनियमनासारखा कायदा उपलब्ध नाही.

 

सध्या असलेला कौटुंबिक अधिनियम संरक्षण कायदा पुरुषांना संरक्षण देत नाही. विकसित देशांमधील लिंग निरपेक्ष कायदे पुरुषांना महिलांप्रमाणे संरक्षण तर देतातच ; शिवाय पुरुष पीडित असू शकतात या वास्तवाचा स्वीकारही करतात. त्यामुळे तिथे या विषयावर संशोधनही होत असते आपल्या देशात  पुरुषही महिला अत्याचाराने पीडित असतात हे वास्तव अजूनही स्वीकारले जात नाही. पुरुष कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरुच शकत नाही अशी धारणा असणारे लोक सामान्यतः असा तर्क देतात की पुरुष हे महिलांपेक्षा बलवान असतात अशास्थितीत महिला पुरुषांवर आघात कशा करू शकतात? पण एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की हिंसक संबंधांमध्ये महिलाही पुरूषांइतकीच आक्रमक होऊ शकते. शिवाय मानसिक छळ करण्यात महिलांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
विशेषतः जे संवेदनशील मनाचे पुरूष असतात ते अशा हिंसाचाराला बळी पडतात त्यामुळे महिलांप्रमाणेच पीडित पुरुषांनाही संरक्षणाचा अधिकार मिळावा त्यासाठी सरकारने कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कायद्यात दुरुस्ती करून पीडित पुरुषांना संरक्षण द्यावे.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here