मुलांमध्ये आक्रमकता वाढली

0
इंटरनेटच्या जगाने लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचे मन आक्रमक बनवले आहे.  या संदर्भाला पुष्टी देणार्‍या अनेक घटना घडल्या आहेत.  मोबाईल, इंटरनेट आदींच्या व्यसनाला बळी पडलेली मुले भयंकर गुन्हे करतात.  मोबाईल वापरायला आणि पब्जी सारखे हिंसक गेम खेळायला अटकाव केल्यावर  मुले त्यांच्या पालकांना मारणे किंवा आत्महत्या करणे यासारखे आत्मघाती पाऊल उचलतात.  गेल्या काही काळात अशा घटना झपाट्याने वाढल्या आहेत.  काही महिन्यांपूर्वी लखनौमध्ये एका सोळा वर्षांच्या तरुणाने आपल्या आईची हत्या केली होती.  कारण ती त्याला मोबाईलवर पब्जी गेम खेळण्यास मनाई करत होती. 
हा मुलगा दहावीचा विद्यार्थी होता.अशा घटना पाहता, इंटरनेटच्या माध्यमातून उद्भवणाऱ्या या हिंसाचाराचे समाजशास्त्र वेळीच समजून घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची नितांत गरज असल्याचे दिसते.  अशा घटनांमुळे कौटुंबिक, समाज आणि सामाजिक वातावरणावर प्रश्न निर्माण होतात.  या घडामोडींवरून असे दिसते की, मुलांच्या सामाजिकीकरणात आपली विशेष भूमिका बजावणाऱ्या कुटुंब आणि शाळा या प्राथमिक संस्थांची जबाबदारी कुठेतरी कमी होत चालली आहे, अशी शंका वाटते. याचा परिणाम असा झाला आहे की मुलं आपलं वेगळं विश्व निर्माण करत आहेत.

 

वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या काही दशकांमध्ये संगणक आणि इंटरनेटवरील माहितीने एक संवेदनशून्य समाज निर्माण केला आहे.  इंटरनेटवर आधारित समाजात आपल्यात परस्पर संवाद साधणाऱ्या संस्था मृत्यू पंथाला लागल्या आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या हिंसक खेळांना तोंड देत आपले मन ताजेतवाने ठेवणारे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम आज समाजातून लोप पावत चालले आहेत.  हे सतत विस्तारणारे आभासी जग आज रोगाचे रूप घेत आहे. शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन, शिक्षण, शिक्षकांची उपस्थिती असूनही शाळांमध्ये हिंसाचाराची मर्यादा ओलांडली जात आहेत. तंत्रज्ञान आणि डिजिटल समाजाच्या विकासाच्या या संक्रमण काळात अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

 

कटू सत्य हे आहे की कुटुंबाच्या विघटनाचा सर्वात जास्त परिणाम मुलांच्या बालपणावर झाला आहे.  आजी-आजोबांच्या देखरेखीखाली वाढलेले बालपण आता कॉम्प्युटर, इंटरनेट, टीव्ही, व्हिडीओ गेम्स या संवादाच्या माध्यमांमध्ये विकसित होत आहे.  या मानसिक-शारीरिक विकासामध्ये, भौतिक समाज गायब आहे.  आज आर्थिक दडपण असताना पालकांना त्यांच्या आयुष्यात उपयुक्त गोष्टी निवडण्याची दिशा काय असावी हे सांगण्यासाठी पुरेसा वेळ नाही.संस्कृती आणि सांस्कृतिक मूल्ये शिकवणारी कुटुंबे आणि शाळाही बालपणापासून दूर होत आहेत.  सध्याचे कटू सत्य हे देखील आहे की कुटुंबातील वडीलधाऱ्यांची भूमिका समाप्त झाली आहे.  लहान कुटुंबांनंतर कामकाजी एकल कुटुंबांमध्ये, आईवडिलांची भूमिकादेखील  मुलांच्या  बालपणापासून नाहीशी होत आहेत.  अशा एकाकी वातावरणात मुले त्यांच्या मनोरंजनाच्या वस्तू निवडण्यास मोकळी झाली आहेत.
Rate Card
त्यामुळे मुलं घराच्या चार भिंतीत बंदिस्त होऊन आभासी जगात जातात.  इंटरनेटवर हिंसक खेळ खेळतात.  गेम जिंकण्यासाठी त्यांना कॉम्प्युटर, व्हिडिओ किंवा मोबाईल स्क्रीनवर एखादे पात्र मारण्यात आनंद वाटतो.  परिणामी ही कृत्रिम पात्रे मारून मोठी झालेली ही मुलं खर्‍या आयुष्यातही तेच करणं सोडत नाहीत.तथ्ये हेच सांगतात की आज देशात आणि जगात कोट्यवधीचा ऑनलाइन गेमचा व्यवसाय आहे.  2019 मध्ये ऑनलाइन गेमचा जागतिक व्यवसाय सदोतीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता.  2025 पर्यंत तो एकशे वीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.  केपीएमजी अहवालावरून असे दिसून आले आहे की, भारतातही हा व्यवसाय सध्या बारा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.  ऑनलाइन गेम खेळणार्‍या लोकांच्या संख्येशी संबंधित आकडेवारी दर्शवते की कोरोनाच्या काळात त्यांची संख्या सुमारे 35 कोटी होती, जी या वर्षाच्या अखेरीस 50 कोटींपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे.  भारत सरकारने गेल्या दोन वर्षांत चीनमधील शंभरहून अधिक अॅप्सवर बंदी घातली असली, तरी नावात बदल करूनही हे हिंसक खेळ अजूनही मोबाईलवर आपले कर्तृत्व दाखवत आहेत.

 

आज मुलं त्यांच्या मित्र, वर्गमित्र आणि नातेवाईकांसोबत जी हिंसा करत आहेत, ती त्यांच्या कमकुवत सहनशक्तीचे आणि त्यांच्या रागाच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.  पूर्वी कुटुंब, शिक्षक आणि शिक्षण या त्रिपक्षीय संगमाने व्यक्तिमत्त्वाला संरक्षणात्मक कवच दिले जात होते.  पण ते चिलखत आता कमकुवत होत चालले आहे असे दिसते.  राग आणि हिंसेला केंद्रस्थानी आणून, मुलांची कल्पनाशक्ती आणि त्यांचे वास्तव यांची सांगड घालून आपले ध्येय गाठण्याचे माध्यम माध्यमांनी बनवले आहे.  हिंसा हा आता मुलांच्या सामान्य अनुभवाचा भाग बनत चालला आहे.संयम, सहिष्णुता, दया, करुणा, अहिंसा या मूल्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे.  ध्येय गाठण्यात होणारा विलंब मुलांकडून असह्य होत आहे.  कुटुंबातील मुलांची स्वतःची ओळख कुटुंबातील इतर सदस्यांपासून विभक्त होण्याची मागणी करत आहे.  त्यामुळेच कुटुंबातील वाद मुलांना असह्य होत आहेत.  मुलांना हिंसेपासून वाचवायचे असेल तर तटस्थतेची भावना सोडून पालकांनी मुलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

बालपणातील स्नेह, प्रेम, दयाळूपणा, सहानुभूती, सत्य-असत्य आणि हिंसा-अहिंसा यातील भेद आणि यातील चांगल्या भावना त्यांच्या जीवनात रुजवण्यात कुटुंब आणि शाळा यासारख्या प्राथमिक संस्थांची भूमिका महत्त्वाची  असते हे वेगळे सांगायला नको.  तसेच, मुलांच्या जीवनातील एकटेपणा, तणाव, निराशा कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यांना सर्जनशील कामकाजांमध्ये गुंतवणे, त्यांना खेळ,कृती व इतर गोष्टीत व्यस्त ठेवणे.याशिवाय मुलांमधील हिंसक भावना कमी करताना पालकांनी त्यांच्याशी जवळीक आणि संवाद प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.  लक्षात ठेवा की मुलांच्या जीवनातील एकटेपणा त्यांना उत्तेजित होण्याच्या विविध अभिव्यक्ती व्यक्त करण्यास प्रवृत्त करते.  मुलाला जे काही सांगायचे आहे ते पालकांनी तसेच शाळेत नीट ऐकून घेतले पाहिजे.  जरी मूल कुटुंबात किंवा शाळेत खूप शांत किंवा एकटे असले तरी त्याचे योग्यरित्या ऐकले पाहिजे आणि सतत सकारात्मक संवादाचे मार्ग शोधले पाहिजेत.  या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळेच मुलांना आभासी आणि हिंसक जगाच्या आव्हानांपासून वाचवता येईल.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.