पोलिसच आमचे पाठीराखे..! | ‘शिवनेरी’च्या महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या

0
तासगाव : शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांची कट रचून अमानुषपणे हत्या करण्यात आली. जाधव हे अनेक माता – भगिनींचे पाठीराखे होते. त्यांच्या हत्येनंतर अनेकांचा आधार हरपला आहे. त्यामुळे शिवनेरीच्या महिलांनी आज पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. यावेळी अनिल जाधव आमचे भाऊ, पाठीराखे होते. त्यांच्या पश्चात पोलिसच आमचे पाठीराखे आहेत, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. तर जाधव यांच्या हत्येतील गुंडांना सोडू नका, असेही मत महिलांनी यावेळी व्यक्त केले.
गेल्या आठवड्यात अनिल जाधव यांच्यावर अमानुषपणे हल्ला चढवत त्यांची हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून कट, कारस्थान रचून विश्वासघाताने ही हत्या घडवून आणण्यात आली होती. जाधव यांच्या हत्येने शिवनेरी मंडळ पोरके झाले आहे. मंडळातील सदस्यांना त्यांनी कुटुंबाप्रमाणे सांभाळले होते. मंडळातील महिलांचे तर ते पाठीराखेच होते.
अनिल जाधव यांच्या हत्येने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. या हत्येतील 6 जणांना पोलिसांनी आतापर्यंत जेरबंद केले आहे.या हत्येतील कोणालाच सोडू नका. दोषींच्या मुसक्या आवळा. गुन्हेगारांची दहशत मोडून काढा, अशी मागणी आज शिवनेरी मंडळाच्या महिलांनी केली.
या महिलांनी आज पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे व गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. जाधव यांच्या हत्येनंतर आता पोलिसच आमचे भाऊ, पाठीराखे आहेत. या घटनेमुळे आम्ही घरी रक्षाबंधन साजरे केले नाही. त्यामुळे आता पुढील काळात तुम्हीच आमचे संरक्षण करा, अशी विनंती महिलांनी यावेळी पोलिसांना केली. यानंतर महिलांनी ढवळवेस येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनाही राख्या बांधल्या.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.