मिठाईत भेसळ केल्यास दंड,कारावासाची कारवाई
सांगली : गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन जागे झाले आहे. मिठाईमध्ये भेसळ केली तर दहा लाखांपर्यंत दंड आणि कारावास होऊ शकतो, असा इशारा त्यांनी शहरातील व्यावसायिकांना दिला आहे.
गणेशोत्सवापासून सणांची धूम सुरू होते. दहा दिवसांच्या या उत्साहातच महालक्ष्मीचा सण येतो. त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि पाठोपाठ दिवाळीचे आगमन होते. सण म्हटले की, मिठाई आलीच. गणेशोत्सवात मोदकाचे नाना प्रकार बाजारात विकायला आले आहेत. मात्र, अनेकदा या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकार घडतात. त्याचा वाईट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होतो.
हे पाहता अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांची एक बैठक घेत त्यांना मिठाईमध्ये भेसळ करू नये अशी कडक तंबी दिली. मिठाईच्या प्रत्येक पॅकवर उत्पादन दिनांक, एक्सपायरी डेट ठळकपणे छापावी. स्वच्छतेबाबत गंभीर रहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

जे व्यावसायिक मिठाईमध्ये किंवा अन्न पदार्थांमध्ये भेसळ करतील किंवा शासनाच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सोबतच पाच वर्षांचा कारावासही भोगावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.