कवठेमहांकाळ,संकेत टाइम्स : गेल्या दोन वर्षांपासून डबघाईला आलेल्या कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याचे धूराडे पुन्हा एकदा पेटण्याची आशा निर्माण झाली आहे.कारखान्याकडे असलेल्या अतिरिक्त ८० एकर जमिनीची विक्री करून हे पैसे कर्जवसुलीपोटी जमा करण्याची परवानगी देणारा आदेश कर्जवसुली न्यायाधिकरणाचे( डीआरटी) पीठासन अधिकारी दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे.
महांकाली सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार ही गोष्ट कवठे महांकाळ तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आणि छोटे मोठे उद्योग धंदे करणाऱ्या नागरिकांना आनंदाची आहे परंतु सभासदांची मालमत्ता असलेली ८० एकर जमीन विकून हा कारखाना सुरू होणार ही दुःखाची बातमी आहे.जर कर्जवसुलीसाठी मालमत्ता लिलावात काढायची असेल अथवा विक्री करावयाची असेल तर ती मालमत्ता अथवा मिळकत ही संबंधित चेअरमन,संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांची असावी असे मत राष्ट्रवादी ओबीसीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी यांनी व्यक्त केले आहे.
सुरुवातीला ज्यावेळी हा कारखाना कवठे महांकाळ येथे सुरू झाला त्यावेळी काही शेतकरी बांधवांनी दुष्काळी भागाच्या विकासासाठी तसेच कवठे महांकाळ परिसराचे नंदनवन होण्यासाठी त्यांच्या जमिनी त्यावेळी असणाऱ्या नेतृत्वावर आणि संचालक मंडळावर विश्वास ठेऊन दिल्या होत्या.त्यांच्या विश्वासाला तडा गेल्याने या जमिनी विकल्या जाऊन नयेत.
याच अनुषंगाने सुरुवातीला कारखान्यासोबत करण्यात आलेले काही जमिनीचे व्यवहार संशयास्पद असल्याने त्या व्यवहाराबाबत कवठे महांकाळ येथील दिवाणी न्यायालयात दावे न्यायप्रविष्ठ असताना ती जमीन विकणे योग्य ठरणार नाही यामुळे कर्जात बुडणाऱ्या कारखान्याला चेअरमन,संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांचा ढिसाळ कारभार आणि आळशी धोरण जबाबदार असल्याने या लोकांच्या मिळकती विकून कारखान्याच्या कर्जाची वसुली करण्यात यावी असे मत कोळी यांनी व्यक्त केले आहे.