इस्लामपुरात पूर्ववैमनस्यातून हल्ला करत एकाच्या खुनाचा प्रयत्न
इस्लामपूर : शहरातील बहे नाका परिसरात बेघर वसाहतीमधील एकावर चौघांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून तलवार,कोयता आणि लोखंडी गजाने हल्ला चढवत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.यातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत जखमी नवनाथ भीमराव कांबळे(वय -२५,राहणार – बहे नाका,बेघर वसाहत) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.त्यानुसार जयवंत उर्फ आबा रघुनाथ शिंदे (वय -२२),उद्धव रघुनाथ शिंदे ( वय -२०,दोघे राहणार – माळगल्ली),रोहित सुरेश जाधव (वय – २८) आणि स्वप्नील उर्फ डी.जे.( दोघे राहणार जावडेकर चौक,इस्लामपूर) अशा चौघाविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील स्वप्नील उर्फ डी.जे. पसार झाला असून बाकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.येथील न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावले आहेत.

या खुनी हल्ल्याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,या चौघा हल्लेखोरांनी नवनाथ कांबळे याचा मित्र संकेत जाधव याला मारहाण केली होती.त्याचा जाब कांबळे याने विचारला होता.हा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी बेघर वसाहतीमधील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारती मधील कांबळे याला गाठून या चौघांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला.तलवार आणि कोयत्याने कांबळे यांच्या डोक्यावर वार करून लोखंडी गजाने पायावर मारहाण करत त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला.
या खुनी हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवनाथ कांबळे याला उपचारासाठी पाठवले.तसेच पळून गेलेल्या चौघा पैकी तिघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्याची कारवाई केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करीत आहेत.
