जतची विस्तारित म्हैसाळ योजना मार्गी लावा | तुकाराम बाबांचे शासनाला साकडे; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
जत,संकेत टाइम्स : जतसाठी वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावावी तसेच जत पूर्व भागातील ६५ गावासाठी तत्वतः मान्यता मिळालेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेला तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देवून योजना मार्गी लावावी अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

तुकाराम बाबा महाराज यांनी मंत्रालय गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य कार्यालयास मागण्यासंदर्भातचे निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, मुख्य म्हैसाळ योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेचा शेवटचा टप्पा बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देणे हा असून तो मार्गी लागल्यास अनेक गावाचा पाणीप्रश्न सुटू शकतो. ही योजना पूर्ण झाली तरी विस्ताराने मोठा असलेल्या जत पूर्व भागातील पाणी प्रश्न कायम आहे. जत पूर्व भागातील ६५ गावे आजही चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहत आहेत.
२०१९ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी संख येघे आलेले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत पुर्व भागातील पूर्णत: ४८ गावे व अशत: १७ गावासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला हिरवा कंदील दाखवला. त्या योजनेस फडणवीस सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. ठाकरे सरकारच्या काळात या योजनेसाठी वारणेतून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहा टीएमसी पाणीही आरक्षित करून डिझाइनचे टेंडर काढले. त्यानंतर मात्र या योजनेला गती आलेली नाही.साधारणपणे या योजनेस हजार ते बाराष्व कोटी रुपये खर्च होणार आहे. २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन या भागातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे . या योजनेला तांत्रिक, प्रशासकीय मान्यता देत आर्थिक तरतूद करण्याची मागणी तुकाराम बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
■ वारकऱ्यांसाठी हवा अपघात विमाराज्याचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी, कार्तिकी वारीला लाखो भाविक पायी जातात. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये वाहने घुसून अनेक अपघात झाले आहेत, वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे तेव्हा दिंडी मार्गावर एका बाजूची वाहतूक बंद करावी, केवळ दिंडीसाठी तो मार्ग ठेवावा तसेच वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांचा अपघात विमा काढावा अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
