आ.गोपीचंद पडळकर नवी फसवणूक करणार | – विक्रम ढोणे : राजकीय स्वार्थासाठी दसरा मेळाव्याचे आयोजन 

0
Post Views : 44 views
सांगली : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील बिरोबा बनात 2 ऑक्टोंबर 2022 रोजी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा हा त्यांचा राजकीय स्वार्थासाठीचा आहे.आ.पडळकर हे नेहमीप्रमाणे बिनबुडाच्या घोषणा करून धनगर समाजाची फसवणूक करतील व भाजपकडून आणखी पदे पदरात पाडून घेतील, अशी भुमिका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडली आहे.

 

ढोणे म्हणाले,आ.गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या नावाने आरेवाडी येथे दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे, तसेच त्यादिवशी अन्य एका गटाकडून मेळाव्याची परवानगी मागितल्याने देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्यांना परवानगी नाकारली आहे. यापार्श्वभुमीवर धनगर विवेक जागृती अभियानाने आपली भुमिका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आहे.

 

ढोणे यांनी म्हटले आहे की, आरेवाडीच्या बिरोबा बनाला शेकडो वर्षांची अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा आहे. तिथे दसऱ्याच्या निमित्ताने लाखो धनगर भाविक येत असतात. तिथे प्रथेप्रमाणे कार्यक्रम होतात, मात्र हा समाज आपल्या पाठीमागे आहे असे दाखवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आ.पडळकर यांनी दसरा मेळाव्याची टूम काढली. सुरूवातीला समाजातील काही पुढाऱ्यांना बरोबर घेण्याचे नाटक केले. त्यानंतर दोन वर्षांत खरे रूप दाखवून मनमानी सुरू केली. 2018 मध्ये जाहीरपणे आरेवाडीला राजकीय अड्डा बनविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही आम्ही या प्रयत्नांना जाहीर विरोध केला होता. हार्दिक पटेल यांना बोलावून घेतलेल्या मेळाव्यात धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या घोषणा केल्या. तसेच भाजपला मतदान न करण्याच्या शपथाही घातल्या.
प्रत्यक्षात पुढील दीड वर्षे पडळकर हे भाजपची दलाली करताना दिसून आले. ते स्वतःच भाजपच्या कमळ चिन्हावर उभे राहिले. यानिमित्ताने पडळकरांनी घेतलेल्या शपथांचे राज्यभर हसू झाले. आ.पडळकर ज्यांच्याविरोधात बोलतात, त्यांच्याशीच आतून सामील असतात हे वेळोवेळी दिसून आले आहे.

 

Rate Card
ढोणे म्हणाले, धनगर समाजाच्या मुलांना एसटीचे सर्टिफिकेट देण्याच्या बाता मारताना स्वतःला आमदारकीचे सर्टिफिकेट आ.पडळकरांनी मिळवले, तसेच माथी भडकविलेली मुलांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात आहे. पडळकर यांना कोणता राजकीय विचार नाही. कधी प्रकाश आंबेडकर हे बाप म्हणून सांगतात तर कधी देवेंद्र फडणवीस यांना बाप म्हणतात. कधी एमआयएमचे असुदुद्दीन ओवैसी यांचा फोटो लावून मते मागतात, दुसरीकडे मुस्लीम द्वेषाचे राजकारण करतात. कोणतीही दिशा नसणारे आ.पडळकर समाजाला काय दिशा देणार, हा मोठा प्रश्नच आहे. आ.पडळकर हे नेहमीप्रमामे स्वतःची झोळी भरण्यासाठी वादग्रस्त विधाने करून तरूणांची माथी भडकवतील, तसेच आलेले लोक दाखवून भाजपशी डिलींग करतील, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

 

ढोणे म्हणाले, आ.पडळकर हे धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न शिंदे- फ़डणवीस सोडविणार आहेत, असे सांगत आहेत. आ.पडळकरांच्या फसवणुकीचा हा दुसरा टप्पा आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हेही धनगरांना एसटी आरक्षण मिळणार आहे, असे सांगत आहे. दीड वर्षांपुर्वी चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न फडणवीस यांनी सोडविला आहे, असेही जाहीरपणे सांगितले होते. दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने धनगर समाजाला एसटी आरक्षण देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिले आहे. मग यातील काय खरे आहे, हे समजू नये यासाठीच आ.पडळकरांचा वापर सुरू असल्याचे ढोणे यांनी सांगितले. धनगर आरक्षणाचा नेमका प्रश्नही आ.पडळकरांना माहित नाही. धनगर समाजाला भ्रमित करण्याचा भाजपचा एजेंडा आ. गोपीचंद पडळकर चालवित असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोध करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आ.पडळकरांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला येणार असल्याचे समजले आहे. त्यांचा दौरा होणार असेल तर लोकशाही मार्गाने धरणे- निदर्शने करून आम्ही आमचा निषेध नोंदविणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.