जत,संकेत टाइम्स : देशातील गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत,यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. मुलं शिकली नाहीत तर देशात गरीब – श्रीमंतांमध्ये दरी वाढत जाऊन लोकांना जगणं मुश्किल होऊन जाईल. हे व्हायचं नसेल तर मुलांना त्यांच्या कलेनुसार शिक्षण दिलं पाहिजे असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते गणेश शिंदे यांनी जत येथे पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.
बालाजी मंगल कार्यालयात शिक्षकांचा हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी तीस शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रतीलाल साळुंखे यांनी केले.
शिंदे पुढे म्हणाले, शैक्षणिक गुणवत्तेत जत तालुका आघाडीवर आहे. मुख्य कार्यधिकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तालुक्याचं कौतुक केलं आहे. तालुक्यात 436 शाळा असून 1228 शिक्षक कार्यरत आहेत. प्राथमिक शाळांमध्ये 29 हजार 980 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 29 शाळा मॉडेल स्कूल झाल्या आहेत तर 23 प्रस्तावित आहेत. मात्र येत्या काही वर्षात संपूर्ण शाळा मॉडेल शाळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, तालुक्यात दुष्काळ असला तरी शैक्षणिक बाबतीत दुष्काळ राहिलेला नाही. शिक्षक विविध उपक्रम राबवून तालुक्याचे नाव राज्यात लौकिक करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच तत्पर आहोत.
यावेळी सरदार पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे, संजय कांबळे,
रामराव मोहिते, संतोष काटे,राजाराम सावंत, दिलीप पवार, संभाजी जगताप, रिहाना नदाफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.