जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वाचन प्रेरणा आणि हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून बालकथा, बालकविता, प्रेरक माहिती वाचून घेण्यात आली. मुलांनी वृत्तपत्रांच्या पुरवणी आणि मासिकात आलेली शब्दकोडी मोठ्या आनंदाने आणि उत्फुर्तपणे सोडवली. जिल्हा परिषदेच्यावतीने प्राथमिक शाळांमध्ये ‘आनंददायी शिक्षण’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमधील गोष्टींचे यावेळी वाचन करण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख रतन जगताप उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाचनाचे आणि हात धुण्याचे महत्व विशद केले. ते म्हणाले,’वाचन केल्याने माणूस घडतो. अफाट वाचन केलेल्या डॉ. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास निर्माण केला. वाचन केल्याने माणूस ज्ञान समृद्ध होतो. तो पुढे आयुष्यात कुठेच मागे राहत नाही. त्यामुळे मुलांनी वाचन अविरत चालू ठेवले पाहिजे.’
शाळेतील पदवीधर शिक्षक आणि पाठ्यपुस्तक लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बालपणातील किस्से सांगितले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी सावंत, सचिन शेळके, निलेश वानखेडे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.