पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई | उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता जाळ्यात | 45 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले
पलूस : पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्या कंपनीने सादर केलेल्या सोलर इन्स्टॉलेशनची फाईल मंजूर करण्याकरिता उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर, रा. तासगाव यांना 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण, रा. नवेखेड चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
याबाबत घाटगे यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सोलर इन्स्टॉलेशनची फाईल सादर केली होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता अतुल पेठकर व सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांनी संबंधिताला 45 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत संबंधिताने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 28, 29 व 30 सप्टेंबर तसेच 3 ऑक्टोबर रोजी चौकशी केली होती. पेठकर व चव्हाण यांच्या विरोधात सापळा रचून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यावेळी पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराला 45 हजार रुपयांचे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर आज संबंधिताला 45 हजार रुपये घेऊन पेठकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी पेठकर यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी करून 45 हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याप्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.