आशा व गटप्रवर्तकांचा पालकमंत्र्यांच्या घरावरील मोर्चा पोलीसानी अडविला | पोलीसांसोबत महिलांची झटापट

0
Post Views : 118 views
सांगली : आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी भाऊबीज व वेतन वाढ मिळावी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांच्या कामावर आधारित मोबदला दुपटीने वाढवा त्यांना मोबदला नव्हे तर किमान वेतन द्या, त्यांना मातृत्व कालीन रजा द्या, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी मंत्रालय वर ११ ऑक्टोंबरला प्रचंड मोर्चा काढला होता.

 

त्यादिवशी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचे प्रतिनिधी व आरोग्य मंत्र्यांशी वरील मागण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.आरोग्य मंत्री यांनी,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत दिवाळी पूर्वी निर्णय जाहीर करु असे स्पष्ट व ठोस आश्वासन त्यांनी दिले होते.पण त्यांबाबत काहीही निर्णय झाला नाही.त्यामुळे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानी ओवाळणी कार्यक्रम करण्याचा निश्चित आशानी केला होता,परंतु पालकमंत्री मुंबईस गेल्यामुळे त्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक त्यांच्या घराकडे जात असताना पोलीसांनी कडे करुन महिलांना अडविले.

 

त्या ठिकाणी काही काळ पोलीस व आंदोलक आशा,गटप्रवर्तकांची झटापटही झाली. शेवटी त्याच ठिकाणी घोषणाबाजी केल्यानंतर सहा.कामगार आयुक्त श्री.गुरव आंदोलन ठिकाणी उपस्थित राहीले. त्यांनी निवेदन स्विकारुन पालक मंत्री सांगलीत आल्यानंतर त्यांची चर्चेसाठी वेळ घेण्यात येईल,असे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, मिना कोळी ,हणमंत कोळी,लता जाधव, सुरेखा जाधव, शबाना आगा,सुवर्णा सणगर, सिमा गायकवाड, अरुणा कदम,वैशाली पवार, वर्षा ढोबळे,रेशमा शेख,वर्षा देशमुख आदींनी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.