सांगली जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतीसाठी धुमशान सुरू | मतदान 18 डिसेंबरला

0
Rate Card

सांगली : ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती  जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आटपाडी तालुक्यातील 26, जत  81, कडेगाव 43, कवठेमहांकाळ 29, खानापूर 45, मिरज 38, पलूस 16,  शिराळा 60, तासगाव 26, वाळवा 88 अशा एकूण 452 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ज्या जिल्ह्यामध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील. ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुध्दा आचारसंहिता लागू राहील. सदर आचारसंहिता ही केवळ ग्रामीण क्षेत्रासाठी लागू असेल. तथापि, नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रासाठी सदर आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पडेल अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ  – दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यांकरीता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाघिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.