जिल्हा परिषद निवडणुकीची ग्रामपंचायतीत रंगीत तालीम, इच्छुकांची मोर्चेबांधणी

0

जत : जत तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रंगीत तालीम होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या कारभाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले असून गाव कारभाऱ्यांना रसद पुरवण्यासाठी यंत्रणा लावली आहे.
जत तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतीत भाजप किंवा कॉग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आमदार आणि माजी आमदारांना तालुक्यावर वर्चस्व सिद्ध करायचे असल्यामुळे यावेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन्ही गटात अटीतटीच्या होणार, हे निश्चित आहे.

गेल्या वेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी सुंदाेपसुंदी झाली होती. अनेक ठिकाणी भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येऊन निवडणुका लढवल्या होत्या.यंदा  नेत्यांनी जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा कायम राहावा, यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे. गावातील पक्षांतर्गत दुफळी मिटवून एकसंध पॅनल लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांनी स्वतःच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होण्यासाठी ग्रामपंचायतीत आपल्या पक्षाच्या कारभाऱ्यांना रसद देऊन, आगामी निवडणुकीचा मार्ग सोपा करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजप आणि कॉग्रेसच्या संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांकडून स्वतःच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीतील गाव कारभाऱ्यांशी संपर्क साधून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची साखर पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकंदरीतच तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.