दुष्काळी जत तालुक्याला पाणी देता की कर्नाटकात पाठवता, दुष्काळी जत तालुक्याला पाणी द्या, जत तालुक्यातील आठ गावांना म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून, मायथळ येथून पाणी जावू शकते त्याला तात्काळ मान्यता द्या या मागणीसाठी तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ, गुडडापूर, संख, सोर्डी, सिद्धनाथ, शेडयाळ, दरीबडची, दरीकोनूर या आठ तलावातील पाणी एकत्र केले. मंगळवारी सकाळी या आठही तलावातील एकत्र केलेले पाणी एका कलशात घेवून तालुका प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली असलेले शिष्यमंडळ सांगली येथे रवाना झाले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांनी कलशासह निघालेल्या शिष्टमंडळाला अडविल्याने पोलीस व शिष्टमंडळ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. जिल्हाधिकारी यांना भेटल्याशिवाय जाणार नसल्याचा पवित्रा शिष्टमंडळाने घेतला अखेर जिल्हाधिकारी यांची भेट झाली.
योगेश जानकर यांची शिष्टाई
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जत तालुका संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी जतच्या या प्रश्नाबाबत गांभिर्य घेत तुकाराम बाबा व जतच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली. सिमाभागातील पाणीसह विविध विकास योजना राबवाव्यात याबाबत यापुर्वीच जानकर यांनी जत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या समवेत निवेदन दिले होते.तुकाराम बाबा यांच्या समवेत,जानकर यांनी जतच्या सिमा भागातील नागरिकांच्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या.यानंतर तात्काळ हालचाली सुरू झाल्या आहेत.
सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर तुकाराम बाबा यांच्यासह शिष्टमंडळाने कृष्णा नदी गाठत कृष्णेचे पाणी कलशात घेवून मुंबईला रवाना झाले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तुकाराम बाबा यांच्यात पाऊण तासाहून अधिक वेळ सकारात्मक चर्चा झाली. जतमधील मायथळ येथील म्हैसाळ मुख्य कालव्यातून व्हसपेठ, गुडडापूर, संख तलावात, अचकनहळळी येथील कालव्यातून सोर्डी, कोळगिरी, शेडयाळ येथील कालव्यातून शेडयाळ, दरीकोनूर, दरीबडची तलावात सायपन पद्धतीने आपल्या हक्काच्या म्हैसाळ योजनेतून पाणी देता येते हे तुकाराम बाबा यांनी नकाशासह मुख्यमंत्र्यांना दाखवले. या आठ तलावात कशा पद्धतीने पाणी जाऊ शकते याचा प्लॅनच तुकाराम बाबा यांनी मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.
जतच्या पाणी योजनेसाठी २ हजार कोटी
तुकाराम बाबासह जत तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी महाराष्ट्र शासनावर दबाव वाढविला.त्याशिवाय गावांनी आम्हाला पाणी दिले नाहीतर कर्नाटकात जाऊ असा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात जतच्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी २ हजार कोटीचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तुकाराम बाबा यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. कमी खर्चात व वेळेत या आठ तलावात म्हैसाळचे पाणी जावू शकते तेव्हा या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी यांना सर्व्हेबाबत सूचना देवू. या कामासाठी आपण माझ्याकडे केव्हाही बिनधास्त या, जतला पाणी मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाहून अधिक वेळ देत शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व आठ तलावात पाणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेवू अशी ग्वाही दिल्याबद्दल तुकाराम बाबा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
सिमाभागातील पाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तुकाराम बाबा यांच्यात बैठक झाली.मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.