मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली १९०० कोटीची म्हैसाळ विस्तारीत योजना जानेवारीत सुरू करण्याचा निर्धार : उद्योग मंत्री सामंत
जत/संख/ उमदी/तिकोंडी,(संकेत टाइम्स टीम): जत तालुक्यातील सीमावर्ती पाण्यापासूव वंचित ६५ गावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९०० कोटींची म्हैसाळ विस्तारीत योजना जानेवारीत सुरू करण्याचा निर्धार केला आहे,यात कसलाही बदल होणार नाही. परंतु ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहीता असल्याने अनेक गोष्टी मला माहीती असूनही बोलता येणार नाहीत. येणारी एक जानेवारीची पहाट जत तालुक्यासाठी अनेक चांगल्या न्यूज घेवून येईल, इतका विश्वास तुम्हाला देतोय, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तिकोंडी व उमदी येथील नागरीकांशी संवाद साधताना दिला.
ना.सामंत म्हणाले, राज्यात आजवर किती सरकारे आले, कोण मुख्यमंत्री, मंत्री होते. कुणी जतला काय आश्वासन दिले याच्या खोलात आता जाण्याची गरज नाही. परंतु एक सत्य आहे, नियतीने आज जतच्या बाबतीत जो डाव टाकला आहे.त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होतील. जतवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. म्हणूनच अवघ्या ४८ तासात मला इथे पाठवले आहे. महाराष्ट्र अखंड रहावा, ही भावना शिंदे फडणवीस यांची आहे.त्यामुळे येत्या सहा महीन्यात जतचा बदल आपणाला दिसल्याशिवाय राहणार नाही.
जतचा वकील म्हणून काम करणारजतमध्ये आज फिरताना खऱ्या अर्थानी येथील दाहकता, लोकभावना, पोटतिडीक माझ्या लक्षात आली आहे. या लोकांना महाराष्ट्र सोडायचा नाही. पण कोणत्याही स्थितीत पाणी हवे आहे. यासाठी मी स्वतः आता पुढाकार घेणार आहे. राज्य सरकारच्या समोर तुमचा एक वकील म्हणून काम करणार आहे. येणाऱ्या दोन कॅबीनेटच्या बैठकीत जतेच्या प्रश्नावरची चर्चा आणि निर्णय आपणाला पाहायला मिळतील असेही सामंत म्हणाले.
मायथळ कॅनॉलची पाहणी
उद्योगमंत्र्यांनी ज्या मायथळ कालव्यातून जतच्या पूर्व भागात पाणी जावू शकते. त्याची दौऱ्याच्या सुरूवातीला पाहणी केली. या कालव्यापासून अडीच किलोमीटरचा फाटा काढून तो नैसर्गिक प्रवाहात सोडल्यास यातून पूर्व भागातील आठ तलाव आणि उमदी पर्यंत पाणी पोहचू शकते. यासाठी २० ते २५ कोटी रूपयांची आवश्यकता आहे. जोपर्यंत म्हैसाळ विस्तारीत योजना पूर्ण होत नाही, तोवर हा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी व नागरीकांनी केली. याची सविस्तर माहीती मंत्री सामंत घेतली. यावेळी माडग्याळ भागातील गावकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्री सामंताना दिले.

एमआडीसीसाठी लवकरच बैठकया भागातील लोकांची पाण्यासह उद्योग उभारावेत, एमआडीसीची मागणी आहे.मी उद्योगमंत्री असल्याने येताना माहीती घेवून आलो आहे. जतेत ५१ आणि २६ हेक्टर अशा दोन शासनाच्या जागा आहेत. याठिकाणी लघु व मध्यम उद्योग उभारता येतील का यासाठी लवकरच बैठक घेणार आहे. मी तातडीने आमच्या विभागाला निर्देश दिले आहेत. परंतु आचारसंहीतेमुळे काही बोलता येणार नाही. पण जतला एमआयडीसी करण्यासाठी तुम्ही बोलावले नाही तरी मी येणार आहे. भले चार दौरे अजून काढायला लागले तरी येवून या भागातील लोकांचे दु:ख, समस्या सोडवणार आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र करार करा : आ. सावंतआ. सावंत म्हणाले, विस्तारीत योजना पूर्ण होईपर्यंत जत पूर्व भागातील २६ हजार एकर क्षेत्राला लाभ ठरणाऱ्या तुबची योजनेतून सायफन पध्दतीने पाणी देणे शक्य आहे. पाणी येवू शकते, हे देखील सिध्द झाले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे सहा टीएमसी पेक्षा अधिकचे पाणी कर्नाटककडे शिल्लक आहे. त्यामुळे हे पाणीच तोवर जतला द्यावे हीच आमची मागणी आहे. यासाठी आपण पुढाकार घेवून दोन्ही राज्यात समन्वय करार करावा अशी मागणी आ. विक्रम सावंत यांनी केली.
मुख्यमंत्री आता मागे हटणार नाहीत: योगेश जानकरजत विधानसभा संपर्क प्रमुख योगेश जानकर म्हणाले, गेल्या महीनाभरात झालेल्या घडामोडी पाहता मुख्यमंत्री खूपच गांभीर्याने जतच्या बाबतीत काम करत आहेत. मी स्वतः यासाठी पाठपुरावा करत आहे.मुंबईच्या बैठकीत तारीखनिहाय त्यांनी विस्तारीत योजनेचे नियोजन केले आहे. आता येथील मूलभूत प्रश्न, समस्याही सोडवल्या जातील. यात मुख्यमंत्री जराही मागे हटणार नाहीत. आपण थोडा वेळ द्यावा.मंत्री उदय सामंत याचसाठी आपणाकडे आले आहेत, कर्नाटकात जाण्याचा विचार आपणही सोडून द्यावा,अशी भावनिक साद जानकर यांनी घातली.