खासदारांच्या गावची ग्रामपंचायत बिनविरोध | सदाशिव माळी सरपंच : खासदार संजय पाटील, अविनाश पाटील यांच्या प्रयत्नांना यश

0
तासगाव : खासदार संजय पाटील यांच्या चिंचणी या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचपदी माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव माळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. खासदार पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करीत जिल्ह्यात आदर्श निर्माण केला.
खासदार संजय पाटील यांचे गाव असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील व खासदार पाटील यांच्यातील गावपातळीवर असणारा कडवा संघर्ष सर्वज्ञात आहे. या संघर्षातूनच गतवेळची निवडणूक रंगतदार झाली होती. या निवडणुकीत खासदारांनी बाजी मारत आपल्या गटाचा सरपंच करण्यात यश मिळवले होते.
मात्र यावेळच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी बिनविरोधचा पॅटर्न अवलंबला होता. खासदारांच्या गावची निवडणूक बिनविरोध करून जिल्ह्यात आदर्श निर्माण करण्यासाठी खासदार पाटील व अविनाश पाटील यांनी कंबर कसली होती. त्यादृष्टीने गेल्या अनेक दिवसांपासून गावात बैठकांचे सत्र सुरू होते. गावात बिनविरोधचे प्रयत्न सुरू असले तरीही सरपंच व सदस्य पदासाठी अनेकजण इच्छूक होते. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांना यश येणार का, असा सवाल व्यक्त होत होता.
Rate Card
खासदार संजय पाटील व अविनाश पाटील यांनी सर्व इच्छूकांना अर्ज दाखल करण्यास सांगितले. कोणालाही अर्ज दाखल करण्यापासून रोखले नाही. अखेर आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. दरम्यान, खासदार पाटील व अविनाश पाटील यांनी उमेदवार व सरपंच पदाची नावे ‘फायनल’ केली. त्यानंतर उर्वरित सर्व उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवारांनीही गावच्या विकासासाठी संघर्ष टाळून आपले अर्ज माघारी घेतले. अखेर चिंचणी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचपदी सदाशिव माळी विराजमान झाले.
खरं तर चिंचणीसारख्या संवेदनशील गावाने बिनविरोधचा घेतलेला निर्णय आदर्श व स्वागतार्ह आहे. निवडणुकांमुळे गावात होणारे वाद, वाढणारी संघर्षाची दरी, पैशाचा अपव्यय, त्यातून एकमेकांपासून दुरावणारे लोक, समाजात, भावकित निर्माण होणारी तेढ हे रोखण्यासाठी गावाने एकदिलाने एकत्रित येऊन घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. तालुक्यातील इतर गावांनीही यापुढील काळात चिंचणीचा आदर्श घेण्याची गरज आहे.
बिनविरोध जि. प. सदस्य ते बिनविरोध सरपंच : सदाशिव माळी यांची झेप
      चिंचणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव माळी हे सरपंच झाले. माळी हे 2007 मध्ये चिंचणी गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते. त्यावेळी ते बिनविरोध सदस्य झाले होते. तब्बल 15 वर्षांनी आज ते सरपंच झाले तेही बिनविरोध. जिल्हा परिषद सदस्य व सरपंच ही दोन्हीही पदे बिनविरोध मिळवणारे सदाशिव माळी हे कदाचित एकमेव असावेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.