आंनददायी | अहंकार नको नाती जपा

0
13

तब्बल वीस वर्ष मनातून व मनापासून जपलेल नातं   समोरच्या व्यक्तीने अगदी काही महिन्यात दुसऱ्याचे ऐकून  सहज तोडून टाकणे व ते नातं जपण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीलाच,” तुला नाते टिकवता येत नाही” अशी बोच देऊन निघून जाणे हा घाव  जिव्हारी बसू शकतो. असा अनुभव अनेक नात्याने आनेकांना येतो. जी व्यक्ती नातं जपण्यासाठी धडपडत होती तीच व्यक्ती त्या नात्याच्या  उडालेल्या एकूण एक ठिकर्या कायमच्या संपविण्यासाठी धडपडू शकते  आणि त्या नात्यात पुन्हा कधीही जिवंतपणा येऊ नये यावर ठाम होऊ शकते. इथे नात्याऐवजी अहंकाराला खतपाणी घातले जाऊ शकते.

 

जिथे अहंकार जपला जाता तेथे नाते संपतेच हे नक्की, अहंकाराने नात्यात शिरकाव केला की उरतो फक्त राग, द्वेष, भीती, नकारात्मकता. त्यासाठी योग्य वेळी सावध होणे गरजेचे असते. फक्त माझे तेच खरे हा अहंकार नात्याची मुळे ढिली करू शकतो. नातं जपण्यासाठी स्वतःच्या मता इतकेच समोरच्या व्यक्तीच्या भावनांनाही वेळोवेळी महत्त्व द्यायला हवे. नाहीतर एकाने फक्त नातं जपावं व दुसऱ्याने सोयीनुसार ते वापरावे. यात कधीच नात्याला किंमत किंवा जिवंतपणा राहू शकत नाही .अशा नात्याचा विनाश हा निश्चित असतो.
प्रत्येक जण आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर विविध नाते अनुभवतो व ते जपण्यासाठी धडपडतो. ही नातं मग ते कौटुंबिक असो, प्रेमाचे असो व मैत्रीचे, कुठलेही नातं निर्माण होते म्हणूनच मनातील खोल गुपितांची देवाण-घेवाण होते. सुखापेक्षा दुःख मोकळेपणाने हलकी केली जातात. कुठेतरी नातं असतं म्हणूनच अशा व्यक्तीला आपण ड्रायव्हिंग करताना शेजारची सेट हक्काने घेऊ देतो. नातं दोन्ही बाजूने जपलं गेलं तरच ते टिकतं. अहंकार हा माणसाचा व नात्याचा शत्रू आहे. उदाहरण द्यायचे झाले तर रावण व दुर्योधनाचे देता येईल , रावण हा महाज्ञानी, महापराक्रमी व महान शिवभक्त होता तरीही अहंकारामुळे नाते गमावून बसला होता.
नात्यातील अहंकाराचा शिरकाव, स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्याला कमी लेखणे, जो नाते जपण्यासाठी धडपडतो फक्त त्यालाच गरज आहे असे वारंवार दाखवून देणे, या गोष्टी नात्याला विनाशाकडे नेतात. आणि एकदा मनातून उतरलेलं कुठलंही नातं पुन्हा त्याच ओढीने, प्रेमाने जोडलं जाणं किंवा जपणे फार अवघड होऊन बसते. त्यात उरतो तो फक्त कोरडेपणा. ज्या नात्यात प्रेमाचा ओलावा नसेल ते फक्त ओझे बनवून राहू शकते. धावपळीच्या वेगवान जीवनात तंत्रज्ञान कितीही मोठे व प्रभावशाली असले तरी मन भरून आलेल्या क्षणी, एकाकी वाटणाऱ्या प्रसंगी डोळ्यातील अश्रूंना पुसणारे हात, मायेचा आधार देणारा खांदा, हे केवळ नात्यातच मिळू शकते. कुठल्याही तंत्रज्ञानाने भावनिक आधार देण्या एवढी प्रगती केलेली नसावी. दोघांच्या नात्यात तिसरी आलेली व्यक्ती कितीही मोठी व श्रेष्ठ असली तरी पहिल्याला घालवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करणारे आजूबाजूला दिसतात. त्यासाठी अप शब्दांचा वापर, खोटे आरोप या गोष्टी खोल जखमा करून जाऊ शकतात. मुळात प्रत्येक नात्याचे स्वतंत्र अस्तित्व असावे. ते व्यवस्थित जपता यावे. प्रत्येक नाते हे महत्त्वाचे असतेच एवढी साधी गोष्ट अहंकार बाजूला ठेवून जर समजून घेतली तर कोणत्याही नात्याचा घटस्फोट होणे टळू शकते.
नाते प्रेरणा देते, आधार देते, थकल्या भागल्या मनाला उंच भरारी घेण्याचे बळ देते, नाते जगवते, नाते घडवते, नाते मनाला उभारी देते .मोठ मोठ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याचे सामर्थ्य नात्यात असते. म्हणूनच अहंकार बाजूला ठेवून योग्य वेळेला त्याची नीव जपली गेली  तर असे नाते कोणत्याही लहान-सहान गोष्टींनी कधीच संपू शकणार नाही. गरज आहे ते दोन्ही बाजूने सारखे प्रयत्न व गरज  असण्याची.
नाती जपण्यासाठी वेळीच चुकांना आवर घालावा, पुन्हा पुन्हा त्याच चुका करणे ही कृती नात्याला विनाशाकडे नेवू शकते. म्हणूनच नात जपण्यासाठी वेळप्रसंगी अहंकार बाजू ला ठेवून चुका दुरुस्त करण्याची ही तयारी असावी. नाती ही नाजूक असतात, त्यांना अहंकाराची नाही तर मायेच्या उबेची गरज असते.अहंकारापायी कुठल्याही नात्याचा बळी देवू नये. प्रसंगी नातं जपण्यासाठी धडपडणार्याच्या चुकांना क्षमाशील वृत्ती ने   माफही करता यायला हवे.
कुणाचं कुणावाचून अडत नाहीच, तरीही क्षुल्लक कारणाने दुरवलेल्या नात्याचा मनापासून पुन्हा विचार करावा. दुरावलेल्या, ठिकर्या उडालेल्या नात्यांची किंमत दोघांसाठीही तितकीच महत्त्वाची असेन तर नक्कीच अहंकाराला तिलांजली देवून नाते जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. नववर्षाची सुरुवात अहंकाराचा नाष व नात्याची जपणूक करुन केल्यास कितीतरी आनंदाच्या क्षणांची पर्वणी पुढे अनुभवता येईल.

मनिषा चौधरी नाशिक
9359960429

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here